कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे झालेल्या हिंसाचारामागे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या निलंबित नेत्याचा हात असू शकतो, असा गंभीर आरोप टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शनिवारी केला. त्यांनी नागरिकांना शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले. जिल्ह्याचे मुख्यालय बहरामपूर येथे रोडशोनंतर झालेल्या सभेत बोलताना बॅनर्जी म्हणाले की, बेलडांगा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांना कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, भाजप आणि एका गद्दाराच्या कटाला बळ मिळू नये म्हणून आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंसाचारादरम्यान जाळपोळ, दगडफेक आणि एका महिला टीव्ही पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत बॅनर्जी म्हणाले की, या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. लोकांनी कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये, असेही त्यांनी सांगितले. खरे स्वरुप उघड होईल…निलंबित टीएमसी नेते हुमायून कबीर यांचे नाव घेत अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, लोकांमध्ये फूट पाडणाऱ्यांना पक्षात स्थान नाही. त्या व्यक्तीला आधीच पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. बाबरी मशिदीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचे खरे स्वरूप लवकरच उघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला.