कोलकता : तृणमूल कॉंग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार शाब्दिक तोफ डागली. मतदारांना गायब करत असल्याने त्यांना व्हॅनिश कुमार म्हणायला हवे, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. ती विचारात घेऊन मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक यांनी राज्यव्यापी जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेवेळी उत्तर बंगालमधील सभेत बोलताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवरील टीकेची धार आणखी वाढवली. त्यासाठी त्यांनी मतदारयाद्या पडताळणीचा (एसआयआर) आधार घेतला. ज्ञानेश कुमार हे जादूगार आहेत. ते जिवंत असणाऱ्यांना मतदारयाद्यांमधून गायब करू शकतात. तसेच, मृत मतदारांना जिवंत म्हणून दाखवू शकतात, अशी खिल्ली त्यांनी उडवली. अभिषेक यांनी एसआयआर प्रक्रियेची तुलना नोटबंदीशी केली. तसेच, केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. नोटबंदीवेळी दहा वर्षांपूर्वी जनतेला स्वप्नं दाखवून रांगांमध्ये उभे करण्यात आले. मात्र, नोटबंदीनंतरही काळ्या पैशांत वाढ झाली. आता दहा वर्षांनंतर जनतेला पुन्हा एसआयआरसाठी रांगांमध्ये उभे केले जात आहे. याआधी जनता सरकार निवडायची. आता केंद्रातील सत्ताधारी मतदार कोण असावे ते ठरवू इच्छितात, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली.