प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या थकबाकीचा डोंगर १३ हजार कोटींच्या घरात गेल्याने प्रशासनाकडून १५ नोव्हेंबरपासून अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१ आणि २०२१-२२ या अभय योजनांचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांनाही आता या अभय योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून आयत्यावेळी गुपचूप या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. अभय योजना जाहीर करताना नवीन योजनेत यापूर्वी लाभ घेतलेल्या थकबाकीदारांना लाभ दिला जाणार नाही, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दबाव वाढल्याने अखेर प्रशासनाने निर्णयात बदल करीत सुधारीत प्रस्तावास मान्यता दिली. यापूर्वी लाभ घेतलेले एकूण १ लाख ४० हजार ४३७ मिळकतधारक आहेत. या सर्वांना १ डिसेंबरपासून अभय योजनेचा लाभ देणे सुरू केले जाणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. ९३५ कोटींची थकबाकी… जुन्या योजनांचे लाभार्थी असलेल्या १ लाख ४० हजार ४३७ मिळकतधारकांकडे तब्बल ९३५ कोटींची थकबाकी आहे. यातील सुमारे ४० हजार थकबाकीदारांनी २०२० नंतरच्या दोन्ही अभय योजनांचा लाभ घेतला होता. मात्र, करोना काळानंतर त्यांना पुन्हा नियमित कर भरता न आल्याने त्यांनी पुन्हा मिळकतकराची रक्कम थकविण्यास सुरूवात केली होती. ही योजना लागू झाल्यानंतर या थकबाकीदारांकडून पुन्हा लाभ देण्याची मागणी केली जात होती. मात्र, प्रशासनाकडून त्यास नकार देण्यात आला होता. मात्र, काही राजकीय पक्षांकडून अशा थकबाकीदारांचा समावेश करण्याची मागणी होत होती. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव मान्य केला आहे. प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता… महापालिकेकडून शहरात अभय योजना प्रस्तावित करण्यात आल्यानंतर शहरातील सामाजिक संघटनांनी त्यास विरोध केला होता. या योजनेमुळे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होत असून अनेक जण वर्षानुवर्षे कर न भरता या योजनेचा लाभ घेतात, अशी तक्रार केली होती. त्यामुळे हा रोष कमी करण्यासाठी प्रशासनाने या पूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थींना वगळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, १५ दिवसातच प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतल्याने या नवीन निर्णयावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.