पिंपरी | अभंगच्या दिवाळी मेळ्यास बालचमूंसह पालकांचा उदंड प्रतिसाद

पिंपरी, (वार्ताहर) – श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे ‘अभंग दिवाळी मेळा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यास बालचमूंसह पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
देहूच्या माजी सरपंच शुभांगी मोरे, सुनिता टिळेकर, माई मोरे, शाळेच्या पालक प्रतिनिधी ॲड. स्वाती हगवणे यांच्या हस्ते या दिवाळी मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
माजी सरपंच सुनिता टिळेकर यांनी अभंग दिवाळी मेळ्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, सचिव प्रा. विकास कंद, संचालक प्रशांत काळोखे उपस्थित होते.
मुलांनी बनविलेल्या वस्तू खरेदीसाठी झुंबड
अभंग दिवाळी मेळ्यात पालक व विद्यार्थी यांनी मनोरंजनात्मक खेळांना अधिक पसंती दिली. शिक्षकांच्या कल्पनेतून साकारलेल्या १६ खेळांचा समावेश यात करण्यात आला होता. खेळामध्ये जिंकणाऱ्या प्रत्येक मुलास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
दिवाळीसाठी लागणारे आकाश कंदील, तोरण, रांगोळीचे स्टीकर्स, किल्ल्यांसाठी विविध प्रकारचे मावळे यांसह चित्रे, पूजेचे साहित्य, मुलांनी रंगविलेल्या पणत्या या साऱ्याच वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.
पालक व विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तूही इथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. लिटिल सायिंटिस्ट हा सेल्फी काॅर्नर साऱ्याच बालचमूंसाठी विशेष आकर्षण ठरला.
दिवाळी मेळ्यात पालकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची रुचकर मेजवानी ठेवण्यात आली होती. यावर्षी दिवाळी मेळ्यातून येणारा नफा अनाथ मुलांचे संगोपन व शिक्षण करणाऱ्या सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे.

