AB de Villiers Advice to Vaibhav Sooryavanshi : आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. वैभवच्या या निडर खेळाची दखल आता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही घेतली आहे. डिव्हिलियर्सने वैभवच्या प्रतिभेचे तोंडभरून कौतुक केले असले, तरी त्याच्या पुढील वाटचालीबाबत एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. “वैभवची खरी परीक्षा अजून बाकी” ‘फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट’ या पॉडकास्टमध्ये बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, इतक्या कमी वयात जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करणे ही अविश्वसनीय गोष्ट आहे. वैभवने पॉवरप्लेमध्ये ज्या प्रकारे आक्रमक फलंदाजी केली, त्यावरून त्याच्याकडे अफाट टॅलेंट असल्याचे सिद्ध होते. मात्र, डिविलियर्सच्या मते, टी-२० मधील हे यश म्हणजे केवळ सुरुवात आहे. खरी आव्हानं तेव्हा समोर येतील, जेव्हा वैभव कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानात उतरेल. “कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळे आव्हान असते,” असे डिविलियर्सने नमूद केले. टी-२० स्पेशलिस्ट की अष्टपैलू क्रिकेटर? डिव्हिलियर्सने वैभवच्या करियरबाबत एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, जर वैभवने केवळ टी-२० फॉरमॅटवर लक्ष केंद्रित केले, तर त्याचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आणि यशस्वी असेल. “जर एखाद्या चांगल्या मॅनेजरने त्याला समजावले की तू आयुष्यभर ‘टी-२० स्पेशलिस्ट’ म्हणून खेळ, तर त्याचे करियर दीर्घकाळ टिकेल. पण जर त्याला कसोटी आणि वनडेमध्ये यश मिळवायचे असेल, तर त्याला आपली तंत्रशुद्धता आणि संयमावर प्रचंड काम करावे लागेल,” असे डिव्हिलियर्सने स्पष्ट केले. हेही वाचा – Mohammad Rizwan Sledging : ‘याला पाकिस्तानमध्ये अजिबात कोण इज्जत देत नाही…’, बांगलादेशच्या खेळाडूने खिल्ली उडवली अन् रिझवान पुढच्याच चेंडूवर क्लीन बोल्ड, पाहा VIDEO कसोटी क्रिकेटमधील प्रवासाची प्रतीक्षा कसोटी क्रिकेटमध्ये केवळ आक्रमकता चालत नाही, तर तिथे संयम आणि मानसिक कणखरतेची गरज असते. वैभवमध्ये ही सर्व आव्हाने पेलण्याची क्षमता आहे का? यावर डिविलियर्सने सकारात्मक उत्तर दिले. तो म्हणाला, “त्याच्यात नक्कीच प्रतिभा आहे, पण हा प्रवास सोपा नसेल. मला त्याला रेड-बॉल क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला नक्कीच आवडेल.” आता हा १५ वर्षांचा मुलगा भविष्यात ‘मिस्टर ३६०’ च्या अपेक्षेवर खरा उतरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.