– प्रकाश गायकर पिंपरी – महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे निवडणुकीचे रण तापू लागले आहे. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांनी पुन्हा जिंकण्यासाठी अनुकूल पक्ष निवडण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या भाजपमधून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक संधीसाधू फिल्डींग लावत आहेत. भाजपचा इलेक्िटव्ह मेरिटचा फाॅम्र्यूला अशा संधीसाधूंच्या पथ्यावर पडत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभागात तयारी करत असलेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी देखील या मेरिटचा धसका घेतला असून अपारदर्शक मेरिटच्या नावाखाली आपल्याला डावलून आयारामांना संधी दिली जाणार असल्याची चिंता त्यांना सतावत आहे. सत्ताधारी पक्षाच्या दावणीला राहण्याची शहरातील अनेक नेत्यांची सवय आहे. ज्या पक्षाकडे सत्ता आहे, किंवा जो पक्ष मजबूत स्थितीत आहे त्याकडून उमेदवारी मिळवून सत्तेची मलाई चाखण्यात पटाईत या नेत्यांनी भाजपच्या निष्ठावंतांची झोप उडविली आहे. भाजपामधील ही खदखद देखील आता बाहेर पडू लागली असून पदाधिकारी समाज माध्यमांवर बोलू लागले आहेत. भाजपामध्ये निष्ठावंताचा अपमान होत असून नव्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. लवकरच पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होणार आहे. नुकताच बिहार विधानसभेच्या निकाल लागला असून त्यामध्ये भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. राज्यामध्ये देखील महायुतीची सत्ता असून भाजपाचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपामध्ये प्रवेशासाठी इच्छुकांची गर्दी वाढत आहे. शहरामध्ये भाजपाने स्वबळाचा नारा दिला असून १२८ जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. सन २०१७ मध्ये ७७ जागी भाजपाने यश मिळवले होते. त्याठिकाणी निवडून आलेले नगरसेवक तिकीटासाठी ठाम आहेतच, तर नव्याने पक्षामध्ये दाखल झालेल्या अनेकांनी तिकीट मागण्यास सुरूवात केली आहे. त्यातच भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला असून इलेक्टिव्ह मेरिट असेल तर तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा प्रभागामध्ये दांडगा जनसंपर्क आहे, मतदारांशी नाळ जोडलेली आहे तसेच निवडून येण्याची क्षमता आहे अशांना तिकीट देणार असल्याचे वरिष्ठांनी घोषित केले आहे. त्यामध्ये पक्षात नव्याने दाखल झालेल्यांचा नंबर लागणार आहे. हीच गोष्ट पक्षातील काहींच्या जिव्हारी लागली आहे. काहीजण समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे तर काहींनी थेट पक्षश्रेष्ठींशीच संपर्क साधला आहे. शहरातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांने नेत्यांना आवाहन केले आहे. दुर्देवाने भाजप कार्यालयात एखादा जुना कार्यकर्ता दिसला तर त्याला मागे बसण्यास सांगितले जाते. कित्येकांना काहीच किंमत राहिली नाही. पण सत्य हेच आहे की पक्ष उभारणारे, कठीण काळात सोबत राहणारे, सत्ता असो वा नसो पक्ष प्रथम, मी द्वितीय या तत्वावर चालणारे कार्यकर्तेच खऱे आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी हे ओळखून योग्य निर्णय घ्यावा. कलाटे, मिसाळ यांच्या चर्चेने पदाधिकारी अस्वस्थ चिंचवड विधानसभा लढवणारे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यातच त्यांनी १२ ते १५ तिकीटांची मागणी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रावादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा आहे. या आयात उमेदवारांना तिकीट दिले तर निष्ठावंतांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठाम भूमिका घेतली पाहिजे, खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकविण्यासाठी आवश्यक पावल उचलली पाहिजेत, हीच आमची आर्त हाक. गूळ असला की मुंग्या येतात आज भाजपामध्ये तेच चित्र आहे, अशी पोस्ट केली आहे. मंत्र्यांची शिष्टाई निष्फळ? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शहरात येत तीनही विधानसभांचा आढावा घेतला होता. यावेळी जुन्या नव्यांचा वाद मिटविण्यासाठी त्यांनी शिष्टाई केली होती. मात्र, ती निष्फळ ठरली असून जुन्या नव्यांच्या वादांसह आता आयारामांना तिकीट दिल्यास आणखी नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मविआला लागणार लाॅटरी? भाजपचे काही इच्छुक आप आपल्या प्रभागांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सकि्रय आहेत. मागील वेळी त्यांना संधी मिळाली नव्हती परंतु त्यांनी सातत्याने काम आणि जनसंपर्क सुरुच ठेवला होता. अशा इच्छुकांना भाजपने डावलल्यास महाविकास आघाडीला आयते चांगले उमेदवार मिळू शकतात. मविआकडे सध्या तुल्यबळ उमेदवार नसल्याचे बोलले जाते. भाजपमधील नाराज गळाला लागल्यास निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक लागू शकतात. महाविकास आघाडीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. त्याची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीपूर्वी होऊ शकते. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मविआच्या स्थानिक नेत्यांनी अशा नाराज पदाधिकारऱ्यांसोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.