मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असणारे मुंबई शहर. याच मुंबई शहर पोलीस आयुक्तलयात स्वतंत्र गुप्तवार्ता विभाग निर्माण करण्यात आला आहे. या विभागाची सूत्रे आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई शहरातील प्रत्येक घडामोडींची खडानखडा माहिती असावी यासाठी हा गुप्तवार्ता विभाग निर्माण करण्यात आला आहे. सध्या मुंबई पोलीस आयुक्तालयात पाच सहआयुक्त कार्यरत असून त्यांच्याकडे गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक, आर्थिक गुन्हे शाखा तसेच प्रशासन अशा विभागांचा पदभार आहे. या विभागांच्या बरोबरीला आता गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त हे नवे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहआयुक्तांची संख्या सहा झाली आहे. कोण आहेत IPS डॉ. आरती सिंह? आरती सिंह या 2006 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. आरती सिंह या मूळच्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या रहिवासी आहेत. त्यांनी एमबीबीएससी पदवी प्राप्त केली असून त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्या आता मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालीच गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त काम करतील. त्यांचा कामाचा अहवाल ते मुंबई पोलीस आयुक्तांनाच देतील. मुंबई पोलीस इतिहासात आरती सिंह या पहिल्याच गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्त बनल्या आहेत. आरती सिंह यांच्याच मार्गदर्शनाखाली बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास झाला होता. सध्या आरती सिंह या आयजी रँकच्या अधिकारी आहेत. उत्कृष्ट सेवा आणि सक्षम नेतृत्व अशी आरती सिंह यांची प्रमुख ओळख आहे. पोलीस कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आरती सिंह यांनी पार पाडल्या आहेत. बहुचर्चित बदलापूर अत्याचार प्रकरणातील विशेष तपास पथकाचे प्रमुखपद त्यांच्याकडे होते.