शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच ‘आपला दवाखाना’ योजनेचा बोजवारा; भाजप आमदाराची आक्रमक भूमिका, ठाण्यातलं राजकारण तापलं…

Sanjay Kelkar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपने १५० पारचा नारा दिला आहे. मुबंईसह ठाण्यातही भाजपने निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारीला सुरूवात केली असून, येथे भाजपने थेट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या एका योजनेवर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शिंदेंच्या बालेकिल्लातच भाजपने शड्डू ठोकला आहे. यामुळे ठाण्याचे राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. सध्याचे महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ‘आपला दवाखाना’ योजना सुरू करण्यात आली होती. या योजनाचा बोजवारा उडाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता यावरून वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : चिंचणीच्या जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी संघाची उत्साहात स्थापना
मागील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. या काळात नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत आणि प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या हेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम सुरू करण्यात आला. शहरातील ५० ठिकाणी दवाखाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला, पण त्यापैकी प्रत्यक्षात ४० दवाखाने सुरू झाले. मात्र, सध्याच्या घडीला बहुतेक दवाखाने बंद करण्यात आले असून जवळपास प्रकल्प ठप्प करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.
अनेक दवाखान्यांच्या जागा आता व्यावसायिक वापरासाठी दिल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी पार्लर, किराणा दुकाने तर एका ठिकाणी तर साड्यांचे दुकानसुद्धा सुरू झाले आहे, असे देखील केळकर यांनी सांगितले. यामुळे आता या प्रकल्पा अभावी नागरिकांचे प्रश्न वाढले असून ठाण्यातील आरोग्यसेवरील प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
आमदार संजय केळकर यांचा थेट इशारा
पालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी केली असून त्यांनी या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास थेट महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील संजय केळकर यांनी दिला आहे.





