AAP : आपचा मोठा निर्णय ; 22 जानेवारीला दिल्लीभर रामलल्लाची मिरवणूक काढणार

AAP : सोमवारी म्हणजेच २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये राम लल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी सर्व देशभरातून तयारी करण्यात येत आहे. त्यातच दिल्लीतील आम आदमी पक्षाने (आप) रामलल्लाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. आपने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण दिल्लीत मिरवणूक काढण्यात येणार आहे. याशिवाय आम आदमी पार्टी संपूर्ण दिल्लीत भंडारा आयोजित करणार आहे. मिरवणूक आणि भंडारा येथे पक्षाचे बडे नेतेही सहभागी होणार आहेत.
उपराज्यपालांकडून सुट्टीचा प्रस्ताव मंजूर
दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना यांना प्रस्ताव पाठवला होता. शनिवारी एलजीने रामलला प्राण प्रतिष्ठेनिमित्त अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. एलजीकडून रजेला मंजुरी दिल्यानंतर दिल्ली सेवा विभागाच्या विशेष सचिवांनी यासंदर्भात आवश्यक आदेश जारी केले होते.
रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकार 20 जानेवारीपासून शनिवारपासून तीन दिवसीय भव्य रामलीला आयोजित करत आहे. आज स्वतः दिल्लीचे मुख्यमंत्री रामलीला पाहण्यासाठी पोहोचणार आहेत. आयटीओजवळील प्यारेलाल सभागृहात २२ जानेवारीपर्यंत दिल्ली सरकारतर्फे रामलीला आयोजित करण्यात येणार आहे. विशेष रामलीला सर्वांसाठी विनामूल्य आहे. श्री राम भारतीय कला केंद्रातर्फे दुपारी ४ ते ७ या वेळेत तीन तास रामलीला थेट रंगणार आहे.
हिमाचलमध्ये उद्या पूर्ण दिवस सुट्टी
राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह आसाम, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा, राजस्थानसह इतर राज्य सरकारांनीही सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी २२ जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. आता हिमाचल प्रदेशच्या सुखू सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी पूर्ण दिवस सुट्टी जाहीर केली आहे.





