पुण्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांचा ताफा “आप’ने रोखला

पुणे, दि. 22 -बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ताफा “आप’च्या कार्यकर्त्यांनी वारजे येथील अतुलनगरमधील सेवा रस्त्यावर अडविला. यावेळी महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखविले.
अचानक झालेल्या या प्रकाराने काही काळ गोंधळ उडाला. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ “आप’चे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते नीलेश वांजळे, अक्षय शिंदे आणि सतीश यादव यांना ताब्यात घेतले. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व “ऑपरेशन लोटस’विरोधात घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, सायंकाळी या तीनही कार्यकर्त्यांना नोटीस बजावून सोडून देण्यात आल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, भाजपकडून “मिशन 2024′ मोहिमेंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी तयारी सुरू केली असून, या मोहिमेसाठीच केंद्रीय अर्थमंत्री पुणे दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून, दिवसभरात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पुणे शहराच्या हद्दीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या भेटी घेतल्या. पुढील दोन दिवस त्या बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड तालुक्यात भेटी देणार आहेत.





