Aakash Chopra 3 suggestions for IPL New Rules : आयपीएल २०२६ चा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. या हंगामात सपाट खेळपट्ट्या आणि फलंदाजांकडून होणारा चौकार-षटकारांचा पाऊस यामुळे गोलंदाज पुरते हतबल झालेले पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमधील हाच एकतर्फीपणा संपवून खेळात गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये उत्तम संतुलन निर्माण करण्यासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी बीसीसीआयला तीन अत्यंत क्रांतिकारी आणि अजब सल्ले दिले आहेत. जर हे नियम लागू झाले, तर टी-२० क्रिकेटचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाईल. पहिला सल्ला: ३ विकेट्स घ्या अन् ५ वा ओव्हर टाका! टी-२० क्रिकेटच्या नियमांनुसार एका गोलंदाजाला सामन्यात जास्तीत जास्त ४ षटके (ओव्हर्स) टाकण्याची परवानगी असते. मात्र, आकाश चोप्राने गोलंदाजांना ताकद देणारा एक भन्नाट नियम सुचवला आहे. त्याच्या मते, जर एखाद्या गोलंदाजाने सामन्यात ३ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या, तर त्याला बक्षीस म्हणून एक अतिरिक्त (५ वा) ओव्हर टाकण्याची परवानगी देण्यात यावी. यामुळे फॉर्मात असलेल्या गोलंदाजाचा संघ पूर्ण फायदा घेऊ शकेल. दुसरा सल्ला: १०० मीटरच्या षटकाराला ६ नाही तर ८ धावा! आकाश चोप्राचा दुसरा सर्वात चकित करणारा सल्ला षटकारांच्या अंतराबाबत आहे. सध्या फलंदाजाने ५० मीटरचा सिक्स मारला किंवा १०० मीटरचा, त्याला ६ धावाच मिळतात. पण आकाशच्या मते, जर एखाद्या फलंदाजाने १०० मीटर किंवा त्यापेक्षा लांब षटकार ठोकला, तर त्याच्या संघाला ६ ऐवजी थेट ८ धावा मिळाल्या पाहिजेत. मोठा षटकार मारण्याच्या नादात फलंदाज बाद होण्याचा धोकाही वाढेल, ज्यामुळे सामन्यातील रोमांच अधिक वाढेल. हेही वाचा – CSK Playoff Scenarios : सीएसके थेट नंबर ४ वर पोहोचणार? पॉइंट्स टेबलमधील ‘त्या’ अजब गणितामुळे राजस्थान-पंजाबची धडधड वाढली! तिसरा सल्ला: मोठ्या विजयासाठी ‘बोनस पॉईंट’चा नियम I wish IPL adopts the Bonus Point option for a massive win… — Aakash Chopra (@cricketaakash) May 21, 2026 आकाश चोप्राने केवळ सामन्याच्या नियमांतच नाही, तर गुणतालिकेत (पॉइंट्स टेबल) बदल करण्याची मागणी केली आहे. लीग स्टेजदरम्यान जर एखाद्या संघाने मोठा विजय मिळवला, तर त्यांना २ ऐवजी ३ गुण (पॉइंट्स) देण्यात यावेत. जर एखादा संघ १५ ते १६ षटकांतच लक्ष्याचा पाठलाग करत असेल किंवा प्रथम फलंदाजी करताना ४० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी सामना जिंकत असेल, तर त्याला हा बोनस पॉईंट मिळाला पाहिजे. आकाश चोप्राचे हे तिन्ही सल्ले क्रिकेट विश्वात सध्या प्रचंड चर्चेत असून, आगामी काळात बीसीसीआय यावर विचार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.