Ashok Saraf : ‘मला साखर आहे, गूळ कुठे आहे?’ अशोक सराफांच्या भन्नाट उत्तराचा संकर्षण कऱ्हाडेंनी सांगितला किस्सा!
Ashok Saraf : ‘आदि अनंत’ चित्रपटाच्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेंनी अशोक सराफ यांचा परभणीतील मजेदार गुळपोळीचा किस्सा सांगितला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

Ashok Saraf : आजोबा आणि नातवाच्या नात्यातील धमाल, मस्ती आणि भावनिक क्षण उलगडणारा ‘आदि अनंत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे ही अनोखी जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून या दोघांमधील गोड नात्याची झलक पाहायला मिळत असून, ही जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. ही गोष्ट केवळ एका चित्रपटातील आजोबा आणि नातवाची नसून, आपल्या घरातील आजोबा-नातवाच्या नात्याची आठवण करून देणारी आहे. दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे यांनी एका कार्यक्रमात अशोक सराफ यांच्यासोबतच्या काही खास आठवणींना उजाळा दिला. त्यातील एका गंमतीशीर प्रसंगातून अशोक सराफ यांचा मिश्कील स्वभाव पुन्हा एकदा समोर आला.
संकर्षण यांनी सांगितलेल्या आठवणींपैकी एक किस्सा आहे परभणीतील. एका कार्यक्रमानिमित्त अशोक सराफ परभणीला आले होते. त्यावेळी संकर्षणच्या आईने सर्वांना घरी जेवायला बोलावण्यास सांगितले. त्यानुसार संकर्षण अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि इतर सहकाऱ्यांना घरी जेवायला घेऊन आला. संकर्षणच्या आईने खास गुळपोळी केली होती. अशोक सराफही गुळपोळीचा मनमुराद आस्वाद घेत होते. तेव्हा निवेदिता सराफ यांनी त्यांना थांबवत, ‘’अशोक, तुला साखर आहे, जरा कंट्रोल ठेव,’’असे सांगितले. त्यावर अशोक सराफ यांनी क्षणाचाही विलंब न लावता, ‘’अगं, मला साखर आहे, गूळ कुठे आहे?’’ असे मिश्कील उत्तर दिले. त्यांच्या या उत्तरातून त्यांच्या विनोदबुद्धीची सहज झलक पाहायला मिळाली. पडद्यावर आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे अशोक सराफ प्रत्यक्ष आयुष्यातही तितकेच मिश्कील असल्याचे या प्रसंगातून जाणवते.
अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त. संकर्षण म्हणाला, आजही अशोक सराफ ठरलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधी सेटवर हजर असतात. आपल्या कामाबद्दलची ही बांधिलकी नव्या पिढीतील कलाकारांसाठी नक्कीच शिकण्यासारखी आहे. विशेष म्हणजे, ‘आदि अनंत’च्या चित्रीकरणाला अवघे चार दिवस बाकी असताना अशोक सराफ यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ठरलेल्या दिवशी ते चित्रीकरणासाठी सेटवर हजर झाले. या काळात निवेदिता सराफ यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. त्या स्वतः सेटवर येऊन सर्व गोष्टींची पाहणी करून गेल्या आणि दिग्दर्शक महेश लिमये यांना आवश्यक त्या सूचना देऊन गेल्या.
अशोक सराफ यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांची विनोदबुद्धी, कामातील शिस्त आणि आपल्या जबाबदारीप्रती असलेली निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू आहेत. ‘आदि अनंत’च्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडे यांनी सांगितलेले हे किस्से अशोक सराफ यांच्यातील कलाकारासोबतच माणूस म्हणून असलेली त्यांची सहजता आणि मिश्कील वृत्तीही उलगडतात. त्यामुळे पडद्यावर या दोघांची आजोबा-नातवाची जोडी पाहाण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
महेश लिमये दिग्दर्शित ‘आदि अनंत’ हा कौटुंबिक चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





