Aadhaar Card: सध्या सोशल मीडियावर आधार कार्डच्या नव्या डिझाइनबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. अनेक पोस्ट आणि काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की सरकार लवकरच आधार कार्डच पूर्ण डिझाइन बदलणार आहे. या नव्या डिझाइनमध्ये फक्त फोटो आणि क्यूआर कोड असलेलं साधं कार्ड देण्यात येईल, अशी माहिती व्हायरल होत होती. या बातम्यांमुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. आधार कार्ड आज प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचं ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत अनेक ठिकाणी आधारची गरज भासते. त्यामुळे त्याच्या डिझाइनमध्ये बदल होणार या बातमीने लोकांमध्ये उत्सुकता आणि भीती दोन्ही निर्माण झाली होती. मात्र, या सर्व अफवांवर आता सरकारने अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, आधार कार्डच्या सध्याच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्याची योजना नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या या बातम्या केवळ अफवा असून त्यात कोणतही तथ्य नाही. Aadhaar Card Aadhaar Card सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, आधार कार्ड फक्त फोटो आणि क्यूआर कोडपुरतं मर्यादित होणार, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. नागरिकांनी अशा भ्रामक माहितीवर विश्वास ठेवू नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, कोणतीही अधिकृत माहिती मिळवण्यासाठी फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर किंवा सोशल मीडिया हँडल्सवरूनच आधारविषयक खरी आणि अचूक माहिती घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे. इतर कोणत्याही अनधिकृत स्रोतांवरून आलेल्या माहितीची खात्री करूनच ती मान्य करावी. (Aadhaar Card) जर तुमच्याकडे आधीपासून असलेलं आधार कार्ड असेल, तर ते पूर्णपणे वैध आणि सुरक्षित आहे. सरकारी सेवा, सबसिडी, बँक व्यवहार आणि इतर सर्व कामांसाठी सध्याचं आधार कार्ड तितकंच उपयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही घाई किंवा चिंता करण्याची गरज नाही. एकूणच, आधार कार्डच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल होणार नसून, सध्या सुरू असलेलं कार्डच पुढेही वापरता येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहून केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणं आवश्यक आहे.