Aadhaar Update : 5 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी मोठी बातमी; 30 सप्टेंबरपूर्वी करा हे काम, नाहीतर पैसे मोजावे लागतील
Aadhaar Update : ५ आणि १५ वर्षांच्या मुलांचे आधार बायोमेट्रिक अपडेट ३० सप्टेंबर २०२६पर्यंत मोफत करता येणार आहे. प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अपडेट का गरजेचे ते जाणून घ्या.

Aadhaar Update : घरात ५ किंवा १५ वर्षे वयाची मुले असतील आणि त्यांच्या आधारमधील बायोमेट्रिक अपडेट अद्याप झाले नसेल, तर पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. UIDAIच्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत मुलांचे आधार बायोमेट्रिक अपडेट मोफत करता येणार आहे. त्यानंतर या सेवेसाठी शुल्क द्यावे लागू शकते.
मुलांचे आधार वेळेत अपडेट न केल्यास शाळेतील प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना ओळख पडताळणीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असते.
५ आणि १५ वर्षांच्या वयात अपडेट का आवश्यक?
मुलाच्या जन्मानंतर आधार नोंदणी करता येते. मात्र ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून फिंगरप्रिंट आणि आयरिस बायोमेट्रिक घेतले जात नाही. मूल ५ वर्षांचे झाल्यानंतर त्याचे फिंगरप्रिंट, आयरिस आणि छायाचित्र अपडेट केले जाते.
यानंतर मूल १५ वर्षांचे झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते. वाढत्या वयामुळे मुलांच्या बायोमेट्रिक ओळखीत बदल होऊ शकतात. त्यामुळे UIDAIकडून या वयात अपडेट करण्याचे आवाहन केले जाते.
Complete Mandatory Biometric Updates of children when they reach the age of 5 and 15, this will help them verify their identity during admissions, examinations, and scholarship applications.
It is free of cost till 30th September. Don’t miss this chance, visit your nearest… pic.twitter.com/ypxOIrBHNe
— Aadhaar (@UIDAI) August 18, 2026
आधार बायोमेट्रिक अपडेट कसे कराल?
मुलाचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. इच्छुक पालक आधार अॅपच्या माध्यमातून आधी अपॉइंटमेंट घेऊ शकतात. केंद्रावर जाताना मुलाचे आधार कार्ड तसेच पालक किंवा कायदेशीर पालकाचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
अपडेट न केल्यास काय होऊ शकते?
शाळेतील प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती किंवा सरकारी योजनांसाठी आधार पडताळणी आवश्यक असल्यास बायोमेट्रिक माहिती अपडेट नसल्यामुळे प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. दीर्घकाळ आधार अपडेट न केल्यास आधार निष्क्रिय होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे ५ किंवा १५ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट ३० सप्टेंबरपूर्वी करून घेणे पालकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.





