Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील सावनेरमध्ये महिला कबड्डीपटूने आत्महत्या केली आहे. कीटनाशक प्राशन करून तिने आपले आयुष्य संपवले आहे. मृत महिला कबड्डीपटूचे नाव किरण सूरज दाढे (वय २९, रा. माळेगाव टाऊन, ता. सावनेर) असे असून या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेने अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने परिसरातही शोक व्यक्त केला जात आहे. आपली आर्थिक अडचणीतून सुटका व्हावी म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष आणि लग्नाच्या नावाखाली एका तरुणाने तिला फसवले. यामुळे ती मोठ्या तणावाला सामोरे जात होती. अखेर हा त्रास असह्य झाल्याने तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणात स्वप्निल जयदेव लांबघरे (३०, रा. पटकाखेडी, ता. सावनेर) असे फरार आरोपीचे नाव असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मयत कबड्डीपटू महिलेची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. शिक्षण घेऊनही हाताला काम मिळत नसल्याने ती नैराश्यात होती. याच दरम्यान ती एका तरुणाच्या संपर्कात आली आणि त्याच्या आमिषाला बळी पडली. धक्कादायक बाब म्हणजे महिला कबड्डीपटूने नोकरी मिळेल या आशेने तरुणाशी लग्नही केले. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी तरुणाने तिला मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली. हा त्रास असह्य झाल्याने महिलेने टोकाचा निर्णय घेत मृत्यूला कवटाळलं. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे रविवारी ७ डिसेंबर रोजी घडली. मयत महिला कबड्डीपटूने विद्यार्थिदशेत विद्यापीठासोबत राज्य व राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवलं. उत्कृष्ट कबड्डीपटू असल्याने आपल्याला नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असल्याने तिने सैन्य दलासोबत पोलिस, होमगार्ड, डिफेन्ससह अन्य विभागांत नोकरीसाठी प्रयत्न केले होते, अशीही माहिती या प्रकरणात समोर आली आहे. उपचारादरम्यान मृत्यू गुरुवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास महिला कबट्टीपटूने कीटकनाशक प्राशन केले होते. त्यानंतर तिला कुटुंबीयांनी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यानंतर तिला नागपूर शहरातील मेडिकल हॅास्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हेही वाचा : जपानला ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का ; त्सुनामीचाही इशारा जारी