Pune Railway Station : पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून तरुण रिक्षात बसला अन्….; धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं?

Pune Railway Station : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असतानाच चोरीच्या घटनाही सातत्याने घडत आहे. रविवारी पहाटे अशीच एक चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात रविवारी पहाटे रिक्षाचालकाने दोन साथीदारांसह प्रवाशावर हल्ला करून जबरी चोरी केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांत प्रवाशी तरुणाने तक्रार दिली असून, फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ही घटना रविवारी पहाटे सव्वातीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांने प्रवाशी तरुणावर हल्ला करत २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी विजय माने (वय २४, रा. नवी मुंबई) या तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावर तक्रारदार तरुण रिक्षाची वाट पाहत उभा होता. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्याच्याजवळ येऊन मी सोडतो असे सांगून तरुणाचा विश्वास संपादन केला. त्याचवेळी आणखी दोघेजण रिक्षात बसले.
रिक्षा टर्फ क्लब रेसकोर्समार्गे भैरोबा नाल्याच्या दिशेने जात असताना रिक्षाचालकाने दोन अनोळखी साथीदारांसह अचानक त्याच्या अंगावर हल्ला केला. खिशातील मोबाील, अंगठी, सोन्याची बाळी आणि रोख रक्कम घेऊन आरोपी फरार झाले. यानंतर तरुणाने वानवडी पोलीस ठाणे गाठत घडलेल्या घटना पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिलांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





