कुदळवाडीतील तरूणाचा कुंडमळा येथील इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

मावळ – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी, २ एप्रिल रोजी घडली. मृत तरुणाचे नाव अमन शफी रेहमानी (वय २१, रा. कुदळवाडी, चिखली) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिखली येथील कुदळवाडी भागातील काही मित्रांचा ग्रुप कुंडमळा येथे फिरण्यासाठी आला होता. यापैकी चार-पाच जणांनी इंद्रायणी नदीत पोहण्याचा निर्णय घेतला आणि पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांना पाण्यातून बाहेर पडणे कठीण झाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना वाचवण्यात यश आले, परंतु अमन पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपदा मित्र तातडीने घटनास्थळी पोहोचले. दुपारी साधारण पाच वाजता अमन पाण्यात बुडाला होता. आपदा मित्रांनी अथक परिश्रम घेऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.





