शेअर बाजारात चढ-उतारांचं वर्ष: सेन्सेक्स-निफ्टीत माफक वाढ, गुंतवणूकदारांना कमी परतावा

मुंबई – सरलेले वर्ष शेअर बाजार निर्देशांकासाठी कमालीचे अडथळ्याचे ठरले. या वर्षात शेअर बाजाराचे निर्देशांक ऐतिहासिक विक्रमी पातळीवर गेले. मात्र ते त्याच वेगाने कमी झाले. अशा परिस्थितीत सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक केवळ पाच टक्क्याने वाढले. त्यामुळे गुंतवणूकदारांना माफक परतावा मिळाला.
या वर्षात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 5.10 टक्क्यांनी म्हणजे 3,763 अंकांनी वाढला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1,192 अंकांनी म्हणजे 3.34 टक्क्यांनी वाढला. या वर्षात शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य केवळ 25.90 लाख कोटी रुपयांनी वाढून 412 लाख कोटी रुपये म्हणजे 4.2 लाख कोटी डॉलरवर गेले.
देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी परदेशात नकारात्मक परिस्थिती असली तरी खरेदी चालूच ठेवल्यामुळे निर्देशांक मर्यादित प्रमाणात वाढण्यास मदत झाली. व्यापारी युद्ध आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनाकलनीय घोषणाबाजीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार गेल्या आठवड्यापर्यंत शेअर बाजारात विक्री करीत होते. मात्र आता या गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे निर्देशांकांत काही प्रमाणात सुधारणा होत आहे.
दुसर्या तिमाहीत विकासदर कमी होण्याबरोबरच कंपन्यांचे ताळेबंद कमी नफादायक राहिले. अशा परिस्थितीत शेअर बाजारात बरीच विक्री झाली. 27 सप्टेंबर रोजी सेन्सेक्स 85,978 या विक्रमी पातळीवर गेला होता. नंतर अमेरिकेने व्याजदरात कपात कमी करण्याचे संकेत दिल्यानंतर आणि व्यापार युद्ध भडकल्यानंतर निर्देशांक परतीच्य वाटेवर गेले. ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स 4,910 अंकांनी म्हणजे 5.82% कोसळला होता.
शुक्रवारी निर्देशांकात घट
दरम्यान शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 191 अंकांनी कमी होऊन 77,414 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 72 अंकांनी म्हणजे 0.31 टक्क्यांनी कमी होऊन 23,519 अंकावर बंद झाला. सध्या वाहनाचे सुटे भाग बनविणार्या कंपन्यांच्या शेअरची विक्री होत आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावावर दबाव कायम आहे. देशातील किरकोळ गुंतवणूकदार आणि संस्थागत गुंतवणूकदार नफेखोरी करीत असल्यामुळे निर्देशांक कमी झाले. गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी 11,111 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.




