झेडपीला भेट मिळालेले गरुडाचे काष्ट शिल्प गायब

सातारा – जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षापासून असलेले गरुडाचे काष्ट शिल्प रहस्यमयरित्या गायब झाले आहे. या शिल्पाची चोरी झाल्याची शक्यता असून सीसीटीव्ही यंत्रणा बऱ्यापैकी बंद असल्याने असे प्रकार होत असल्याचे वास्तव आहे. गरुडाच्या काष्ट शिल्पाच्या अचानक गायब होण्याच्या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसून येत आहे.
सातारा जिल्हा परिषदेला वेगळी परंपरा आहे. जिल्हा परिषदेचा नावलाैकिक राज्यभर नव्हे तर देशभर पोहोचला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत जिल्हा परिषदेत उठावदार काम होताना दिसत नाही.
जिल्हा परिषदेच्या मालमत्ता, साहित्याची खुलेआम लूट होत आहे. प्रशासकीय राजवटीत काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून हम करोसो कायदा याप्रमाणे कारभार सुरु आहे. जिल्हा परिषदेचा विस्तार मोठा असल्याने प्रशासनाच्यावतीने सुरक्षा रक्षकांबरोबर सीसीटीव्हीचा वॉच आहे. मात्र, हे सीसीटीव्ही ठराविक ठिकाणीच असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. दोन दिवसांपूर्वीच औषधे नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेत औषधे ठेवल्यानंतर लगतच असलेली लाेखंडी खिडकी त्याच रुग्णवाहिकेतून गायब झाली. असे साहित्य बऱ्याच ठिकाणी असल्याने याबाबत कोणास मागमूसही लागला नाही.
भरणे (ता. खेड, रत्नागिरी) येथील ग्रामसविचालयाच्यावतीने १८ जानेवारी २००२ रोजी सातारा जिल्हा परिषदेस भेट देण्यात आलेले गरुडाचे लाकडी काष्ट शिल्प गायब झाले आहे. अतिशय आकर्षक असे हे काष्ट शिल्प नजरेत भरेल असेच होते. काही महिन्यांपूर्वी हे काष्ट शिल्प तिसऱ्या मजल्यावर धूळ खात पडले होते.
याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर हे काष्ट शिल्प एका विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून हे शिल्प गायब झाले आहे. प्रशासनाला याची अद्याप तरी माहिती नाही. हे शिल्प चोरीस गेले की कुणी घरी नेऊन त्यावर मालकी हक्क दाखवला हा सध्या तरी संशोधनाचा विषय आहे. जिल्हा परिषदेत थोडं लक्षं दिल्यानंतर लाेखंडी खिडकी आणि गरुडाचे काष्ट शिल्पाची चोरी या घटना उघडकीस आल्या. अशा प्रकारच्या किती चोरी होत असतील त्याचा विचार न केलेला बरा. निदान जिल्हा परिषदेस मिळालेले पुरस्कार, भेट मिळालेल्या वस्तू यांची तर काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
शिल्प माघारी देऊन झेडपीचा लाैकिक जपावा
जिल्हा परिषदेतून गरुडाचे काष्ट शिल्प अचानक गायब होण्यामागे अनेक कंगोरे असले तरी सद्यपरिस्थितीत हे शिल्प चोरीस गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यास सत्य उजेडात येण्यास मदत होणार आहे. ज्या कोणा चोरट्याने हे शिल्प चोरुन नेले असेल तो हे शिल्प भंगारात तर नक्कीच देणार नाही. संबंधित चोरट्याकडे हे शिल्प असेल तर त्याने ते जिल्हा परिषदेस परत करावे, अशी आर्त हाक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील कोणी चुकून हे शिल्प नेले असेल तर त्यांनी परत करण्याची गरज आहे.





