अहमदनगर | अधिकारी व कर्मचारी संपावर गेल्याने काम ठप्प

पारनेर – पारनेर नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी संपावर गेल्याने कामकाज ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केले. महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील संवर्ग अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.
इतर राज्य शासकीय कर्मचारी यांना एकतर जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन योजना आता नव्याने येऊ घातलेली यूपीएस लागू असताना राज्यातील सुमारे ६००० संवर्ग अधिकारी व ६०००० पेक्षा जास्त कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय निवृत्ती योजना येऊन देखील कित्येक नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मयत पावले. त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही लाभ मिळू शकलेला नाही.
त्याचप्रमाणे एका बाजूला नगर विकास विभाग संवर्ग अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा लागू करतो, दुसऱ्या बाजूला वित्त विभाग शासकीय कर्मचारी नाहीत, असे घोषित करून सेवार्थ आयडी देण्यास नकार देत आहे.
आमच्या इतरही मूलभूत मागण्या मान्य होत नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यात कमालीचा असंतोष पसरल्याने आज पारनेर नगरपंचायतीच्यावतीने अध्यक्ष विजय मोरस्कर, उपाध्यक्ष सुनिल गांगुर्डे, सदस्य माधव गाजरे, क्रांती वाघमळे, राजश्री घोडके, संजय शिंदे, मारुती ठोंबरे, संतोष अंबुले, राजेंद्र पठारे, अशोक सुपारे, छगन औटी, चंद्रकांत गायकवाड, अरुणा सोनवणे व इतर कर्मचारी संपात सहभागी होते.





