महायुती सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांची दखल घ्यावी म्हणून, पाण्याच्या टाकीवर चढून महिलेने केले ‘आंदोलन’

पंढरपूर । धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सकल धनगर समाजाने ९ सप्टेंबरला पंढरपुरात राज्यव्यापी आमरण उपोषणला सुरुवात केली. स्वातंत्र्यापासून धनगर समाज एसटीच्या आरक्षणासाठी झगडत आहे. सरकारने धनगर समाजाला आरक्षण द्यावे. आता आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय माघार नाही असा इशाराही धनगर समाजाकडून महायुती सरकारला दिला होता.
अशात आता या उपोषणाची दखल घ्यावी म्हणून धनगर समाजातील एका महिलेने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. या महिलेचे नाव विश्रांती भूषणर असे आहे. पंढरपुरात राज्यातील वेगवेगळ्या भागातील धनगर समाजातील नेते आमरण उपोषण करत आहे. याची महायुती सरकारने दखल घ्यावी म्हणून विश्रांती भूषणर या महिलेने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
View this post on Instagram
यावेळी या महिलेला स्थानिक प्रशासन आणि मान्यवरांकडून समजूत काढण्यात तारांबळ उडाली. काहीवेळा नंतर समजूत काढत विश्रांती भूषणर या महिलेस पाण्याच्या टाकीवरून खाली उतरविण्यात आले. दरम्यान पंढरपुरातील धनगर समाजाने ९ सप्टेंबरला पंढरपुरात सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा वाढतांना दिसत आहे.
धनगर समाजाच्या या उपोषणातील नेत्यांची स्थानिक आमदारांनी विचारपूस केली आहे. तसेच उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा धनगर समाजाच्या मागण्यांबाबत सतर्क आहे. पंढरपुरातील राज्यव्यापी आमरण उपोषण थांबावे अशी विनंतीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, सकल धनगर समाजाचे राज्य समन्वयक प्रा. शिवाजी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाबाबतची पूर्वसूचना दिली होती. या शिष्टमंडळात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, अमोल कारंडे, सुनील बंडगर, निमिषा वाघमोडे, देवीदास पाटील, सुभाष म्हस्के, देवेंद्र मदने, सिद्धारूढ बेडगनूर, अतुल गावडे, यशवंत नरुटे, यलगुंड सातपुते, राम वाकसे आदींचा समावेश होता.
प्रा. बंडगर म्हणाले होते की, धनगर समाज अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या साठ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रत्येक शासनाने आश्वासनापलीकडे पदरात काहीही दिले नाही. त्यामुळे समाजात सरकारच्या विरोधात असंतोष वाढला आहे. या प्रश्नाची तड लागेपर्यंत आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.





