Satara: लिंब येथे क्रांतिज्योतींना अनोखे अभिवादन

सातारा – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी लिंब, ता. सातारा येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकीतून 70 जणांनी रक्तदान करत क्रांतिज्योतींना अनोखे अभिवादन केले.
लिंब, ता. सातारा येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठानमार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करुन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत 10 महिला व 60 पुरुष अशा 70 जणांनी रक्तदान करत क्रांतिज्योतींच्या कार्याला अभिवादन केले.
शिबिराचा प्रारंभ लिंब गावचे ज्येष्ठ नागरिक दीपक शिंदे, नवनाथ शिंदे व ह.भ.प अमित महाराज सावंत तसेच अक्षय ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप सकटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला.रक्तदान केल्यानंतर प्रतिष्ठानच्यावतीने सर्व रक्तदात्यांना विविध भेटवस्तू आणि सत्यशोधक समाजाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले. शिबिरामध्ये ब्लड बँकेच्या राजू राठोड, सागर जाधव, दिव्या साबळे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. शिबिरानंतर प्रतिष्ठानच्यावतीने अक्षय ब्लड बँकेच्या संपूर्ण टीमला महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांची प्रतिमा व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.





