मुंबई- सोनी मराठी वाहिनीने ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा भारतातील पहिला कीर्तनावर आधारित रिअॅलिटी शो सादर करत महाराष्ट्राच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाला अभिनव मानवंदना दिली आहे. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांतून १०८ कीर्तनकारांचा सहभाग असलेला हा शो कीर्तन परंपरेचा आत्मा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन सुरू होत आहे. या शोचा शुभारंभ आणि पु. ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेली चांदीची वीणा ट्रॉफीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. यावेळी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे एमडी गौरव बॅनर्जी, सूत्रसंचालक गीतकार ईश्वर अंधारे, परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील आणि ह.भ.प. राधाताई सानप, तसेच विविध संतांचे वंशज आणि मान्यवर उपस्थित होते.
कीर्तनाचा आत्मा जपणारा शो
हा शो केवळ एक स्पर्धा नाही, तर महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ठेव्याला उजाळा देणारा उत्सव आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि भक्तीचे पावित्र्य जपण्याची परंपरा या शोद्वारे नव्या रूपात लोकांसमोर येणार आहे. ह.भ.प. राधाताई सानप यांनी कीर्तनातून शिक्षण आणि सामाजिक जागृतीला चालना देत महासांगवी संस्थानाला वैभव मिळवून दिले, तर ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांनी प्रामाणिकपणे हीच जबाबदारी सांभाळली. या कार्यक्रमात संत नामदेव, संत तुकाराम, संत शेख महंमद, संताजी जगनाडे, निळोबाराय आणि बहिणाबाई यांच्या वंशजांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, ज्यामुळे कार्यक्रमाला अध्यात्मिक आधार मिळाला.
मुख्यमंत्र्यांचे उद्गार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सोनी मराठीने ही अभिनव संकल्पना मांडून कीर्तन परंपरेला नवे व्यासपीठ दिले आहे. आजचे तरुण कीर्तनकार समाजाला चांगले विचार देत आहेत, यामुळे मला खात्री आहे की आपली सनातन परंपरा कधीच नष्ट होणार नाही. हा शो म्हणजे सांस्कृतिक चळवळ आहे, जी महाराष्ट्राचा पवित्र वारसा जिवंत ठेवेल आणि त्याची भरभराट करेल.”
सोनी मराठीचा संकल्प
गौरव बॅनर्जी म्हणाले, “हा शो महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा साजरा करणारा उत्सव आहे. ‘विणुया अतुट नाती’ या आमच्या ब्रीदवाक्यानुसार, कीर्तनाची अवीट गोडी आणि संस्कृतीचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. हा कार्यक्रम प्रत्येक घरात कीर्तनाचा वसा आणि वारसा घेऊन जाईल.”
कधी आणि कुठे पाहाल?
डॉ. सदानंद मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेला हा शो टेलिव्हिजनच्या इतिहासातील पहिला कीर्तन-केंद्रित रिअॅलिटी शो आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता सोनी मराठीवर प्रसारित होईल. हा शो कीर्तन परंपरेचे नवे दर्शन घडवणार आहे!