अशोक चव्हाण आणि मनोज जरांगेंमध्ये दोन तास चर्चा; भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

Ashok Chavan Meets Manoj Jarange | अंतरवाली सराटीमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अंतरवलीतील सरपंचांच्या घरी ही भेट झाली असून तब्बल दोन तास अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, मनोज जरांगेंनी सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर झालेल्या भेटीने चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “अशोक चव्हाण सरकार, समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. आमच्या मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा सुरुच ठेवणार आहोत. सगेसोयऱ्यांच्या आमच्या व्याख्येप्रमाणे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेण्यात यावा. तसंच मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी चर्चा झाली आहे,” असं मनोज जरांगेंनी सांगितले.
तर अशोक चव्हाण म्हणाले की, “आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना असल्याने संवाद होणे गरजेचे आहे, त्यामुळे आलो आहोत,” असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली
मनोज जरांगे यांची आजपासून मराठवाड्यात शांतता रॅली सुरु होणार आहे. हिंगोलीपासून सकाळी 11:30 वाजता शांतता रॅलीला सुरुवात झाल्यानंतर दुपारी 3 वाजता या शांतता रॅलीचा समारोप होईल. यानंतर त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे.
तर सोमवारी ८ तारखेला शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. चार दिवसांचा हा दौरा असून यावेळी शिंदे समिती हैदराबाद गॅझेटबाबत पुरावे जमा करणार आहे. मराठा कुणबी असल्याचं या नोंदी ऐतिहासिक पुरावे हे सगळं हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून जमा करण्यात येतील. कुणबी आरक्षण लागू करण्यासाठी हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट आणि सातारा संस्थानचे गॅझेट आधार घ्यावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा:
49th Maharashtra State Outdoor Rowing Championship : ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाची बाजी…




