Satara | महायुतीत मंत्रीपदासाठी रस्सीखेच; जिल्ह्यात पाचजण इच्छुक

सातारा, – विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडा साफ केल्याने जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण झाले आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश होण्याची शक्यता असली तर प्रत्यक्षात मात्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाइ, आ. महेश शिंदे हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. सातारच्या पालकमंत्रीपदी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले की आ. मकरंद पाटील याची उत्सुकता लागून राहिली असून शिवसेनेतून शंभूराज देसाइ की महेश शिंदे यांची वर्णी लागणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचा निकालात जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता लागली आहे. यापूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. आता पुन्हा शंभूराज देसाईंसह शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील , आ. महेश शिंदे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. सरकारचा नवीन फार्मुला म्हणून पहिल्यांदा आमदार झालेले अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याचीही उत्सुकता आहे. पालकमंत्री होण्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले व मकरंद पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरणार की पुन्हा शंभूराज देसाइ पालकमंत्री होणार याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
जिल्ह्यात महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारल्याने महायुतीचे सर्व आठही उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई, आ\शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, महेश शिंदे, तसेच नव्याने आमदार झालेले अतुल भोसले, मनोज घोरपडे आणि सचिन पाटील यांचा समावेश आहे. महायुतीतील या आमदारांपैकी कोणाला मंत्रिमंडळात संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांना मंत्रिपदाने यापूर्वी हुलकावणी दिली होती; पण आता महायुतीची निर्विवाद सत्ता आल्यामुळे मंत्रिपदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्यामुळे त्यांचे नाव मंत्रिमंडळाच्या पहिल्याच यादीत असणार असल्याचे कार्यकर्त्याकडून सांगण्यात येत आहे. महायुतीने शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद दिले होते. अखेरच्या टप्प्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपदी संधी मिळेल, असे वाटत होते. तसा शब्दही त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता; पण त्यांना संधी मिळाली नाही, तर दुसरीकडे अजित पवार यांनी महायुतीत सहभाग घेतल्यानंतर वाईचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची संधी आली होती; पण त्यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्याला मदत मिळावी, यासाठी त्यांनी मंत्रिपद घेतले नाही. तसेच माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनाही मंत्रिपदासाठी वेटिंगवर राहावे लागले होते. त्यामुळे आता ते मंत्रिपदावर दावा करू शकतात. एकंदर जिल्ह्यातील पाचजण मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
यावेळेस भाजपचे डॉ. अतुल भोसले व मनोज घोरपडे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील हे पहिल्यांदा आमदार झाले आहेत. यापैकी अतुल भोसलेंच्या प्रचारसभेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्याचा शब्दही कराडमधील सभेत दिला होता. मनोज घोरपडे व सचिन पाटील यांना महामंडळ किंवा कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्षपदही दिले जाऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे पाच आमदार मंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यापैकी कोणाला राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री पद मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. याबाबत सध्या मुंबइत मोठ्या घडामोडीत सुरु असून कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे.
पालकमंत्रिपदासाठी भाजप, राष्ट्रवादी आग्रही
जिल्ह्यात यावेळी आठही आमदार महायुतीचे निवडून आल्याने मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा सुरु आहे. मंत्रिपदासोबत पालकमंत्री पद मिळावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. यावेळेस पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील या तिघांत रस्सीखेच राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी शंभूराज देसाई हे पालकमंत्री राहिलेले असल्याने त्यांच्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे व मकरंद पाटील यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. यावेळी पालकमंत्रीपदासाठी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.





