थिरूवनंतूपरम : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विभाजित पक्षांमध्ये आता केरळवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. डाव्या पक्षांची सत्ता असणाऱ्या केरळमध्ये राष्ट्रवादीचे २ आमदार आहेत. अजित पवार पक्षाने त्या आमदारांवर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवला आहे. तसेच, त्यांना राजीनाम्याचा आदेश दिला आहे. मात्र, संबंधित आमदारांनी ते शरद पवार यांच्या सोबत असल्याची भूमिका घेतली आहे. केरळमध्ये २०२१ यावर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी अविभाजित पक्ष होता. संबंधित निवडणुकीत राष्ट्रवादीचे २ उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये थॉमस के. थॉमस आणि ए.के.शशिंद्रन यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने त्या राज्यातील सत्तारूढ डाव्या लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे त्या पक्षाला केरळमध्ये १ मंत्रिपद मिळाले. त्यामुळे शशिंद्रन सध्या मंत्री आहेत. तर, थॉमस राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत.आता शशिंद्रन आणि थॉमस या केरळमधील आमदारांवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्या आमदारांना उद्देशून अजित पवार पक्षाचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी पत्र पाठवले. त्याविषयीची माहिती मंगळवारी उघड झाली. संबंधित पत्रातून आमच्या घड्याळ या चिन्हावर केरळमधील आमदार निवडून आल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्या चिन्हावर निवडून येऊनही शशिंद्रन आणि थॉमस अजित पवार पक्षाविरोधात कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. अन्यथा, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. मात्र, केरळमधील दोन्ही आमदारांनी अजित पवार पक्षाच्या पत्राकडे दुर्लक्ष करण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. आमच्यासह राष्ट्रवादीची केरळ शाखा प्रारंभापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत आहोत. आमचा अजित पवार पक्षाशी संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती थॉमस यांनी पत्रकारांशी बोलताना केली. अजित पवार पक्षाने अपात्रतेच्या कारवाईचा इशारा दिल्याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले. त्यावर संबंधित मुद्द्यावर केरळ विधानसभेचे सभापती निर्णय घेतील, असे उत्तर त्यांनी दिले. केरळमध्ये पुढील वर्षीच्या एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी आता काही महिन्यांचाच अवधी शिल्लक आहे. अशात त्या राज्यातील २ आमदारांवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये शह-काटशहाचे राजकारण तीव्र बनण्याची चिन्हे आहेत.