Pimpri : पिंपळे गुरवमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या विचारांना मानवंदना

पिंपळे गुरव : श्रमिक, शोषित आणि उपेक्षित समाजासाठी आवाज उठवणारे महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रावस्ती बुद्ध विहार, पिंपळे गुरव यांच्या वतीने सामाजिक जागृती आणि आदरभावनेने कार्यक्रम पार पडला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, समाजप्रबोधन, साहित्य व संघर्षमय वाटचालीवर चर्चा झाली. त्यांच्या क्रांतिकारी विचारांची प्रेरणा आजही तितकीच सशक्त आहे, असे मत वक्त्यांनी मांडले. कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष कैलास बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतील बंडखोर ऊर्जा व सामाजिक समतेचा संदेश उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडला. आजच्या काळात त्यांच्या विचारांची आवश्यकता अधिक तीव्र आहे. त्यांच्या कार्यातून सामाजिक समतेचा जो उजेड पसरला, तो पुढील पिढीने टिकवावा,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात श्रावस्ती बुद्ध विहारच्या सदस्यांनी अण्णा भाऊ साठेंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेतली. संविधानिक मूल्यांनुसार कार्य करण्याचे वचन देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा बनसोडे यांनी केले.





