15 झोन झाले कमी : पाच दिवसांमध्ये 9 नव्या परिसरात “करोना’चा शिरकाव पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रतिबंधित क्षेत्रातही (कन्टेन्मेंट झोन) वाढ होत आहे. रविवारी (दि. 3) आयुक्तांनी 21 कन्टेन्मेंट झोन जाहीर केले होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये म्हणजे शुक्रवारपर्यंत (दि. 8) 9 कन्टेन्मेंट झोनमध्ये वाढ झाली. त्यामुळे कन्टेन्मेंट झोनची संख्या आता 30 पर्यंत जाऊन पोहचली आहे. तर, 15 कन्टेन्मेंट झोन कमी झाले आहेत. करोना बाधितांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता महापालिकेकडून सध्या दररोज दोन ते तीन कन्टेन्मेंट झोन जाहीर केले जात आहेत. आयुक्त हर्डीकर यांनी रविवारी शहरातील एकूण 21 कन्टेन्मेंट झोन जाहीर केले. त्यानंतर गेल्या पाच दिवसांमध्ये 9 कन्टेन्मेंट झोन वाढले आहेत. रविवारपर्यंत करोना बाधित रुग्णांची संख्या ही 121 होती. तर, शुक्रवार सायंकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महापालिका हद्दीतील करोना बाधित रुग्ण 155 इतके आहेत. त्यातील 76 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर, शहरातील तीन आणि शहराबाहेरील परंतु पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी झालेले कन्टेन्मेंट झोन : 1) कुंभार गली-ओव्हाळ वस्ती-पुनावळे. 2) ताथवडे चौक – ताथवडे चौक – ताथवडे. 3) जीवननगर – ताथवडे. 4) खंडोबा माळ – भोसरी. 5) पिंपळेसौदागर. 6) नागेश्वरनगर, मोशी. 7) शिवतेजनगर, थेरगाव. 8) पडवळनगर, थेरगाव. 9) गणराज कॉलनी. 10) घरकुल, चिखली. 11) क्रांतीवीरनगर, थेरगाव. 12) बी.यू.भंडारी, दिघी. 13) आदिनाथनगर, भोसरी. 14) संभाजीनगर. 15) रोडे हॉस्पिटल, दिघी. अधिकाऱ्यांकडेच माहिती नाही “करोना’वर मात करण्यासाठी सर्वच शहरांमध्ये सूक्ष्म नियोजन करुन कार्यवाही केली जात आहे. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कोणत्या कन्टेन्मेंट झोनमध्ये किती रुग्ण आहेत आणि प्रतिबंधातून मुक्त करण्यात आलेल्या 15 कन्टेन्मेंट झोनमध्ये यापूर्वी किती रुग्ण होते आणि त्यांची सद्य:स्थिती काय, याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडे प्रतिबंधातून मुक्त झालेल्या कन्टेन्मेंट झोनमधील रुग्णांची संख्या आणि सद्यस्थितीबद्दल विचारणा केली असता त्यांनी संबंधित माहिती सध्या उपलब्ध नसल्याचे आणि कमी केलेल्या कन्टेन्मेंट झोननिहाय माहिती काढावी लागेल, असे सांगितले. करोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले. शहरात 11 मार्चला पहिला रुग्ण सापडल्यापासून आत्तापर्यंत एकूण 45 कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले. त्यातील 15 कन्टेन्मेंट झोन कमी झाले आहे. तर, सध्या 30 कन्टेन्मेंट झोन आहेत. – संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त.