इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ उडवून देण्याची पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी थेट विमानतळ संचालकांच्या मेलवर आली आहे. विमानतळ प्राधिकरणाला नोबडी नावाच्या मेल आयडीवरून हा धमकीचा मेल मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या विमानतळ प्राधिकरणाने तातडीने एरोड्रोम पोलिस स्टेशनला माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत, गुन्हा नोंदवून विमानतळावर शोध मोहीम सुरू केली.
गेल्या दोन महिन्यांत इंदूर विमानतळावर बॉम्बची धमकी देण्याची ही तिसरी वेळ आहे. याच्या दोन दिवसांपूर्वी इंदूर, भोपाळ आणि ग्वाल्हेरसह देशभरातील ५० हून अधिक विमानतळांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्या धमक्यांची चौकशीही संपली नव्हती तेव्हा पुन्हा एकदा इंदूर विमानतळावरील या धमकीने व्यवस्थापन चक्रावले आहे.
शुक्रवारी सकाळी इंदूर विमानतळाच्या संचालकांच्या मेलवर नोबडी नावाच्या अज्ञात मेल आयडीवरून ही धमकी आली, ज्याची विमानतळ व्यवस्थापनाने गांभीर्याने दखल घेत तत्काळ तक्रार दाखल केली. एरोड्रोम पोलिस ठाण्याचे बीडीएस आणि श्वानपथक पथक घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली. तथापि, आतापर्यंतच्या झडतीमध्ये विमानतळावर कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसली नाही. सध्या विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला असून आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची किंवा सामानाची कसून तपासणी केली जात आहे.