पिंपरी – एका अल्पवयीन मुलीने आपल्याच मैत्रिणीच्या आईचे सोशल मीडियावर अश्लील तयारी करुन बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 पासून 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चिखली परिसरात घडला आहे.
याबाबत पिडीत 41 वर्षीय महिलेने याबाबत बुधवारी (दि. 14) चिखली पोलीस ठाण्यात मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलीची एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री होती. काही कारणांमुळे फिर्यादी यांनी आपल्या मुलीला त्या मुलीशी मैत्री आणि संपर्क तोडण्यास भाग पाडले. या कारणावरून चिडलेल्या अल्पवयीन मुलीने फिर्यादी यांना त्रास देण्याच्या आणि अपमान करण्याच्या उद्देशाने त्यांचे इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले.
त्यावर फिर्यादी यांच्या पत्त्यासह वैयक्तिक माहिती देऊन फिर्यादी यांच्या चेहरा वापरून त्यांचे अश्लील फोटो तयार केले. ते अश्लील फोटो आणि अपमानास्पद मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केला. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने याबाबत अधिक तपास करीत आहेत.