पिंपरी | पवना शिक्षण संकुलात एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम

पवनानगर, (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक विद्यार्थी, एक वृक्ष लागवड व संवर्धन या अभिनव उपक्रमाची सुरुवात पवना शिक्षण संकुलात करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेशभाई शहा, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे आदी उपस्थित होते.
संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलतील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण यासाठी संस्थेने या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देणार असून विद्यार्थ्यानी ते आपल्या घराच्या अंगणात, शेतात अथवा आपल्या शाळेत लावावे व त्याचे वृक्षसंवर्धन वर्षभर करावे. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन केल्यानंतर वर्षअखेरीस त्याला संस्थेच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलातील सुमारे ९ हजार विद्यार्थी असून त्यांना पर्यावरण उपयुक्त महत्वाची रोपे दिली जाणार आहेत, असे संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी सांगितले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे संस्थेने कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी हा पर्यावरणपूरक उपक्रम मागील शैक्षणिक वर्षापासून सुरु केला आहे. प्लॅस्टिक मुक्तीसाठी संस्था संचलित सर्व शाळा, महाविद्यालयातील ९ हजार विद्यार्थ्यांस व कर्मचारी यांना कापडी पिशवी देण्यात येत आहे.
या साठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी., श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे तसेच मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत या सामाजिक शैक्षणिक व सहकार संस्थांनी सहकार्य केल्याची माहिती या वेळी देण्यात आली.





