जवानांना कडक सॅल्यूट! सियाचीनमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीतही सैन्य मजबूत

जम्मू- भारतात थंडीने चांगलाच जोर घेतला आहे. अशा परिस्थितीत समूद्रसपाटीपासून तब्बल 21 हजार फूट उंच असलेल्या बर्फाळ सियाचीनमध्ये भारतीय लष्कराचे जवान भारतीय सीमेचे संरक्षण करण्यात व्यस्त आहेत. अशा बहादूर जवानांसाठी भारतीय लष्कराने थंडीविरोधात सामना करण्याकरता अनेक अत्याधुनिक सुविधा पुरवल्या आहेत.
सर्वांत उंचावरील युद्धभूमी म्हणून ओळख असलेल्या सियाचीन येथे शून्य ते उणे 50 अंश सेल्सिअस तापमान असते. या तापमानात मनुष्य राहूच शकत नाही. अशा परिस्थितीतही भारतीय लष्कराचे जवान हातात बंदूक घेऊन पाकिस्तानविरोधात लढत असतात. अशा जवानांसाठी सियाचिन ग्लोशिअर आधारावर शिविर प्रतापूर आणि खालसर येथे सेंट्रल हीटिंगचे दोन शेल्टर तयार करण्यात आले आहेत.
प्री-फॅब्रिकेटेड असलेल्या शेल्टर्समध्ये 62 जवान राहू शकतात. तसेच, आठ-आठ जवानांच्या तुकडीसाठी लहान शेल्टर्सही बांधण्यात आले आहेत. यामध्ये आधुनिक शौचालय, सेंट्रल हिटिंग सिस्टिम, आधुनिक स्वयंपाकघर, मोकळी जागा देण्यात आली आहे. अशाप्रकारचे शेल्टर लडाखच्या काही उंच भागातही बनवण्यात येत आहेत. सीमा रस्ता संघटनेनेही लडाखमध्ये सौर ऊर्जेपासून गरम राहतील असे शेल्टर बनवले आहेत.





