प्रभात वृत्तसेवा सातारा – सातार्यामध्ये फ्लॅट घेण्यासाठी पैसे द्या, एका वर्षाने दुप्पट पैसे देतो, असे सांगून, बहीण व तिच्या पतीची 62 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उदय अशोक मोदी (रा. कंरजे, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संजय शिवचरण मोदी (वय 55, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यात फ्लॅट घ्यायचा आहे. त्यासाठी पैसे नाहीत. ते तुम्ही द्या, मी एका वर्षात दुप्पट पैसे परत देतो, असे उदय मोदी यांनी बहीण दीपाली व पती संजय मोदी यांना सांगितले. त्यामुळे संजय मोदी यांनी 40 लाख रुपये व दीडशे तोळ्यांचे सोन्याचे दागिने दि. 13 जुलै 2012 रोजी उदय मोदी यांना दिले. मात्र, एक वर्ष उलटून गेल्यानंतरही उदय यांनी पैसे परत दिले नाहीत. पैसे मागिल्यावर उदय यांनी टाळाटाळ केली. त्यांनी काही वर्षांनी संजय यांना 15 लाख 11 हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर 13 वर्षे कोणताही परतावा न देता 62 लाख रुपयांची फसवणूक केली, असे संजय मोदी यांच्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गवळी तपास करत आहेत.