पुणे -पोलीस दलातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य, खेळ सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या स्पर्धेतील सहभागामुळे खेळाडुंचा दर्जा उंचावून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करतील, अशी अपेक्षा राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांनी व्यक्त केली. तसेच पुण्यात पोलीस दलातील खेळाडुंसाठी क्रीडा संकुल उभारण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सेठ यांनी दिली. राज्याचे पोलीस महासंचालक सेठ यांच्या हस्ते 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे राज्य राखीव पोलीस बल क्र. 2 मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद, होमगार्डचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार उपस्थित होते. सेठ म्हणाले, पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल. या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील एकूण 13 संघ सहभागी होत असून, 18 क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. राज्यातून 2 हजार 590 खेळाडू सहभागी झाले आहेत. अपर पोलीस महासंचालक सिंह म्हणाले, “खेळाडुंनी खिलाडू वृत्तीने खेळावे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू तयार होतील त्याचा फायदा खेळाडू सोबतच राज्य पोलीस दलाला देखील होणार आहे.” पोलीस महासंचालक सेठ यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी शानदार संचलन केले. संचलनप्रमुख पोलीस उपनिरीक्षक किशोर कुमार टेंभुर्णे यांनी खेळाडुंना शपथ दिली. प्रारंभी पोलीस दलातील श्वान पथकाने चित्तथरारक प्रात्यक्षिके तसेच विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ सादर केले.