श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूरनगरीत उत्स्फूर्त स्वागत

राजेंद्र वाघमारे
नेवासा – आषाढी वारीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची पंढरपूर येथे क्षेत्र प्रदक्षिणाद्वारे दिंडी काढण्यात आली या पालखी दिंडीचे पंढरपूरनगरीत भाविकांच्या वतीने चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.”ज्ञानोबा माऊली तुकाराम” असा जयघोष करत काढण्यात आलेल्या या दिंडीत सुमारे दीड हजार भाविक सहभागी झाले होते.
पंढरपूर येथील भिमा तिराजवळ असलेल्या देवगड संस्थानच्या मठामधील प्रांगणातून गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत रविवारी दि.१४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखी क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीस प्रारंभ झाला.यावेळी देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पालखी रथावरील पुष्पांनी सजविण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुकांची वेदमंत्राच्या जयघोषात पूजा करण्यात आली.
यावेळी पंढरपूर क्षेत्र प्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखी शोभायात्रा दिंडी मिरवणुकीस “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल,श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ भगवान की जय” “ज्ञानोबा माऊली तुकाराम”श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबा की जय,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत प्रारंभ झाला.अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेले झेंडकरी पथक, त्यामागे गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत भजने गाणारे भजनी मंडळाचे पथक,पुष्पांनी सजवलेली पालखी,त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भगिनी असे या दिंडीचे स्वरूप होते.
सदरची दिंडी भीमातिरीच्या पुलावर आल्यानंतर गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते गंगा जलाने पालखीतील पादुकांचे पूजन करून गंगामाईस साडी चोळी अर्पण करण्यात आली.सदरच्या पालखी दिंडीचे पंढरपूर नगरीत आगमन झाल्यानंतर चौकाचौकात पुष्पवृष्टी करत पंढरपूर वासीयांनी उत्स्फूर्त असे स्वागत करून सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीतील पादुकांचे पूजन केले.आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी देखील या प्रदक्षिणा दिंडीतील पालखीत असलेल्या पादुकांचे दर्शन घेतले.सदर प्रदक्षिणा दिंडी विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर शिरसाष्टांग वंदन करून गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी काढण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा पालखी क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीमध्ये संतसेवक हभप श्री मारुतीबाबा काळे,हभप नारायण महाराज ससे,हभप गणपत महाराज आहेर,संजय महाराज निथळे,रामनाथ महाराज पवार,हभप लक्ष्मण महाराज नांगरे,संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे, अमोल महाराज बोडखे,मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव,शशिकांत महाराज कोरेकर,गायनाचार्य बाबासाहेब महाराज सातपुते,शुभम महाराज बनकर,उमेश महाराज जाधव यांच्यासह हजारो महिला व पुरुष भाविक सहभागी झाले होते.यावेळी मठ प्रांगणात ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात झालेले रिंगण सर्वांचे आकर्षण ठरले होते.
तब्बल तीन तास चाललेल्या पायी प्रदक्षिणा पालखी दिंडीची सांगता उत्तर भीमा तिरी असलेल्या देवगडच्या मठाच्या प्रांगणात महाआरतीने करण्यात आली.यावेळी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दुपारच्या सत्रात श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळयाच्या निमित्ताने पंचदिनात्मक सोहळयाचा नामदेव गाथा पारायणाने शुभारंभ करण्यात आला.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगडच्या दिंडीने महाराष्ट्रात शिस्तबद्ध दिंडी म्हणून नावलौकिक मिळविला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन वर्षांपासून दिंडी सोहळा रद्द करण्यात आला होता त्यानंतर वाढते प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या सूचनेनुसार दिंडी सोहळा रद्द करून पंढरपूर येथील देवगडच्या मठात पंचदिनात्मक कार्यक्रमाद्वारे पालखी सोहळा साजरा करण्यात येतो.
गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी बाबांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली सुरू झालेल्या पंचदिनात्मक सोहळयात सकाळी व दुपारच्या सत्रात श्री नामदेव गाथा पारायण,दुपारच्या व सायंकाळच्या सत्रात भोजन प्रसाद,रात्री ८.३० ते १०.३० कीर्तन असे कार्यक्रम होऊन पंचदिनात्मक सोहळा साजरा होणार आहे.
यानिमित्ताने दि.१७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री ८.३० ते १०.३० यावेळेत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांचे कीर्तन होऊन दि.१८ जुलै रोजी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या किर्तनाने आषाढी पालखी सोहळयातील पंचदिनात्मक उत्सवाची सांगता होणार आहे.





