Nevase News : रिंगणात रंगली भक्तीची फुगडी; आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील पत्नीसह झाले सहभागी
Nevase News : त्यामुळे आमदार लंघेची ही धार्मिक फुगडी या रिंगण सोहळ्याचे खास आकर्षण ठरली.

नेवासे : नेवासे येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचा पहिला रिंगण सोहळा माऊलींची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासे येथे बुधवारी (दि.८) रोजी मोठ्या भक्तीभाव आणि धार्मिक वातावरणात न्हावून निघाला. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”चा नामघोष करत हा पालखी दिंडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना या हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित नेवासे विधानसभा मतदार संघांचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांना एक पारंपरिक ‘फुगडी’ खेळण्याचा मोह आवरलेला नाही.
त्यांच्या पत्नी रत्नमाला लंघे – पाटील आणि संत ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या बरोबर फुगडी खेळून हा रिंगण सोहळ्याचा आनंद द्विगुणीत केला. त्यामुळे आमदार लंघेची ही धार्मिक फुगडी या रिंगण सोहळ्याचे खास आकर्षण ठरली. यापूर्वी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचा पारंपरिक ‘फुगडी’ खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच प्रसारित झालेला होता तर जालन्यातील एका दिंडी सोहळ्यात आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी देखील या सोहळ्यात एकत्र फुगडी खेळल्याचा व्हिडिओ सुद्धा खूप चर्चेत आला होता.
आता नेवाश्याचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी त्यांच्या पत्नी आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या बरोबर मोठ्या धार्मिक भक्तीभाव आणि आनंदाच्या वातावरणात ही फुगडी खेळल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांची ही फुगडी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे.





