प्रभात वृत्तसेवा जांबूत – शिरूरच्या तालुक्याच्या बेट भागातील पिंपरखेड येथे दाभाडे मळा रस्त्यावर गुरुवारी (दि. 13) रात्री साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून चाललेल्या महिलेच्या समोर बिबट्याने अचानक उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून ही महिला थोडक्यात बचावली असून या रस्त्यावरील बिबट्याच्या वाढत्या वावर मुळे ग्रामस्थांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सुनिता पवार या गावातून दाभाडेमळा रस्त्यावरून आपल्या दुचाकीने जात असताना रस्त्याच्या कडेला झाडावर दबा धरून असलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यासमोर उडी मारली. हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला पाहून सुनिता पवार अतिशय भयभीत झाल्या; मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी लगेच दुचाकी वळवून कशीबशी तेथून सुटका करून घेतली आणि आपला जीव वाचवला. या जीवघेण्या अनुभवानंतर काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले.पिंपरखेड गावातून दाभाडेमळा व मधला मळ्याकडे जाणारा हा रस्ता असून गावापासून हजार फुटांच्या अंतरामध्ये ओढ्यालगत असलेल्या या रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे आहेत, बिबट्याला लपण्यासाठी आणि वास्तव्यासाठी सुरक्षित जागा आहे. या झाडांवर बिबट्याचे वास्तव्य सातत्याने दिसून येत आहे. या धोकादायक रस्त्यावरून पहिली ते बारावीचे अनेक शालेय विद्यार्थी जीव मुठीत धरून शाळेत जातात. बिबट्याचा हा वाढता वावर आणि चुकीच्या धोकादायक पद्धतीने लावलेली झाडे आता शाळकरी मुलांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. धोकादायक झाडे तत्काळ काढण्याची मागणी बिबट्याच्या दहशतीने यापूर्वी झाडे काढण्याची मागणी केली होती परंतु त्यावेळी फक्त झाडांची छाटणी करून रस्ता मोकळा केला गेला. मात्र आता बिबट्याने झाडावरून उडी मारत हल्ल्याचा प्रयत्न केल्याने धोकादायक असलेल्या झाडांबाबत पालक व ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अतिशय चुकीच्या आणि धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या बाजूला असलेली ही झाडे एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी वन विभागाने तत्काळ काढून टाकावीत अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.