मुंबई : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थींना नव्या वर्षाचे खास गिफ्ट मिळणार आहे. मकर संक्रांतीपूर्वी एकूण तीन महिन्यांचे हप्ते (नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी) मिळून ४५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा केला जाईल. त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते एकत्रित किंवा वेगवेगळे देण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे लाभार्थी महिलांना नववर्षात आर्थिक आधार मिळेल. सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, डिसेंबर अखेरिस जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने हप्ते लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता पुढे ढकलला? राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या ४ तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी २० डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे २२ तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना १७ जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. ई-केवायसीला मुदतवाढ शक्यता निवडणुकांच्या व्यग्रतेमुळे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. सध्या ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. लाभार्थी महिलांनी अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी, जेणेकरून हप्ते थांबणार नाहीत.