पुण्यात महायुतीत वादाची ठिणगी? ‘त्या’ पाच जागाही शिवसेनेची लढण्याची तयारी

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत महायुती म्हणून लढलेल्या भाजप आणि शिवसेनेत पुण्यात वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (ठाकरे गट) मधून पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मात्र, या पक्ष प्रवेशाला शिवसेनेने अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविली असून या पाच नगरसेवकांच्या जागा शिवसेनाच लढविणार असल्याची घोषणा शहर प्रमुख नाना भानगिरे यांंनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेचे शहर व जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले यावेळी उपस्थित होते. तर भाजपकडून या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा अथवा माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले.
भानगिरे म्हणाले की, राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत आम्ही महायुती म्हणून काम केले. गेल्या अडीच वर्षात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. या दोन्ही निवडणूकांंमध्ये ज्यांचा विद्यमान खासदार, आमदार ती जागा त्या पक्षाची असे जागा वाटपाचे सूत्र होते.
हेच सूत्र महापालिका निवडणूकांमध्येही कायम असणार आहे. त्यामुळे, २०१७ मध्ये तत्कालीन शिवसेनेने लढविलेल्या जागा आम्ही लढविणार आहोत. जे पाच नगरसेवक भाजपमध्ये जात आहेत त्या जागा ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढले होते. त्यामुळे या जागा शिवसेनेच्या असून या जागा आम्हीच लढविणार असल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे.
भाजपची कोंडी ?
जे पाच नगरसेवक भाजपमध्ये जाणार आहेत त्या जागा त्या नगरसेवकांना कायम ठेवण्याचे आश्वासन पक्षाकडून देण्यात आले आहे. मात्र, आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत या जागा शिवसेनाच लढविणार असल्याची भूमिका घेतल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.
पुण्यात २०१७ मध्ये शिवसेना स्वबळावर लढली असली तरी १० जागा निवडून आल्या होत्या. ज्या जागांवर त्यांनी दावा केला असून पक्षाकडून आणखी ३० जागांची मागणी महायुतीच्या जागा वाटपात केली जाणार आहे. त्यासाठी पक्षाकडून शहरात सर्वे केला जात असून स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही सुरू असल्याने भानगिरे आणि भोसले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.





