नागपूर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ; बॅगेत तब्बल जिलेटीनच्या ५४ कांड्या आढळल्या

मुंबई : नागपूर रेल्वे स्थानकावर आज एकच खळबळ उडाली. रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या तब्बल ५४ कांड्या सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर रेल्वे स्टेशनच्या गेटच्या बाजुला वाहतुक पोलिसांची एक चौकी आहे. या चौकीच्या मागच्या बाजुला एक बेवासर बॅग आढळून आली. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ५४ जिलेटीनच्या कांड्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पोलीस चौकी परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्याची माहिती नागपूर रेल्वे पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच नागपूर रेल्वे पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. त्या बेवारस बॅगेची तपासणी केली असाता त्या बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असल्याचे नागपूर रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले.
नागपूर पोलिसांनी या सर्व ५४ जिलेटीनच्या कांड्या बॉंब शोधक पथकाच्या ताब्यात दिल्या आहेत. बॉंब शोधक पथकाने या कांड्या नागपूर पोलिस मुख्यालयाकडे नेल्या असून त्या निकामी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
योग्यवेळी हा स्फोटकांचा साठा निदर्शनास आल्यामुळे संभाव्य धोका टळला. या जिलेटिनच्या कांड्या इथे आल्या कश्या आणि त्या कोणी आणल्या याचा तपास नागपूर पोलिस करत आहेत. या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्य़ात येणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या बाजुलाच अशी स्पटोकं सापडल्यामुळे या परिसराच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





