Satara : सत्ताधाऱ्यांकडून छत्रपती शिवरायांचे फक्त राजकीय भांडवल

सातारा : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सत्ताधाऱ्यांकडून राजकीय भांडवल केले जात आहे. अरबी समुद्रत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करणार होते पण अद्याप ते केले नाही. आम्हाला छत्रपतींचा आदर्श असून तो कार्यकर्त्यांच्या नसानसात भिनावा, स्फूर्ती जागृत व्हावी म्हणून आता यापुढे राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता जय शिवराय म्हणून कार्यास सुरुवात करणार असल्याची माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी रविवारी दिली.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक राष्ट्रवादी भवनात झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
आ. शिंदे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत राजकीय भांडवल केले जात आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करणार होते पण अद्याप ते केले नाही. आम्हाला छत्रपतींचा आदर्श असून तो कार्यकर्त्यांच्या नसानसात भिनावा, स्फूर्ती जागृत व्हावी म्हणून आता जय शिवराय म्हणणार आहोत. पक्षीय धोरणातून आम्ही तसे ठरवले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा जय शिवराय सुरुवातीला म्हणणार आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कार्यास सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करायचे असून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीस शिवरायांचा आदर असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षश्रेष्टींनीं बैठक घेतली असून जोरदार बांधणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हयातील आढावा बैठका झाल्यानंतर प्रत्येक मतरदारसंघनिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील पुरोगामी विचार बाजूला जात असल्याचे दिसत आहे. छ. शिवाजी महाराजांचा आदर सर्वाना आहे. काही लोक औरंगजेबाचे उदात्तीकरण करून राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाज वितुष्ट करत आहेत. छत्रपतींच्या जिल्हयातून विकासासह इतर प्रश्न आम्ही प्राधान्याने घेणार आहे. विधिमंडळ, मंत्रालय, जिल्हास्तरीय कार्यालय येथे जनतेच्या प्रश्नासाठी जाणार असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी आम्ही केली असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
पक्ष संघटना मजबुतीवर भर – हर्षवर्धन पाटील
खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून माझी आणि आ. शशिकांत शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हयात आढावा बैठक सुरु झाल्या आहेत. सातारची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधून त्याचा बोध घेत पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभासद नोंदणी करून जिल्हयाचा समितीत बदल व नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांपर्यंत सातत्याने राहून जनतेचे प्रश्न उठवले पाहिजेत. विधानसभेला आमचा पराभव झाला तो जनतेने दिलेला कौल आहे. पुन्हा पक्ष संघटन बांधून, मजबूत करून नव्याने सुरुवात करणार असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.





