तीव्र वळण ठरले काळ! दुचाकी रस्त्याखाली कोसळल्याने खांडवी येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

कर्जत : कोंभळी-घोगरगाव रस्त्यावरील कोंभळी पाझर तलावाजवळ असलेल्या तीव्र वळणावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात खांडवी (ता. कर्जत) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे खांडवी परिसरात शोककळा पसरली आहे. सागर तापकीर (वय ३३) आणि सचिन गिरमकर (वय ३७) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर आणि सचिन हे दोघे आपल्या दुचाकीवरून कोंभळीकडून घोगरगावच्या दिशेने जात होते. कोंभळी पाझर तलावाखालील परिसरात एक अत्यंत तीव्र वळण आहे. या वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट रस्त्याच्या खाली गेली. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मयत तरुणांच्या निधनाने दोन कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सचिन गिरमकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सागर तापकीर यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. रस्त्यावरील धोकादायक वळणे आणि सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.





