satara | वडूथ विभागामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने गावोगावी बैठकांचे सत्र

शिवथर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण तापत चालले असून वडूथ विभागामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने गावोगावी बैठकांचे सत्र चालू झाले असून महायुती आणि महाविकास या दोन्ही आघाडी त्याचबरोबर इतर घटक पक्षांनी सुरु केले आहे. मुख्य लढत ही महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यामध्येच होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून उमेदवार कोणीही असूद्या आपल्या गावच्या वॉर्डामध्ये तसेच बुथवरती कशाप्रकारे काम करायचे, त्याच्या वेळोवेळी बैठका घेऊन नियोजन आखले जात होते. फक्त आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसून आले.
याबरोबरच विभागातील प्रत्येक गावांमधील कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन वार्ड तसेच बुथ कमिट्यांवरती सुध्दा काम सुरु केले आहे. दोन्ही गटांकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातीर लग्न, बारसे, यात्रा, उत्सव, सात्वंनपर भेटी घेऊन दौरे सुरु आहेत. तसेच गावागावात प्रचाराची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी तालुक्याच्या नेत्यांच्या गाठीभेटी तसेच गावोगावच्या ठिकाणी गाठी भेटी घेत प्रचार दौरे सुरु आहेत. यावेळी आपल्या पक्षाने तसेच नेत्यांनी केलेली विकास कामे आणि प्रस्तावित विकासकामे यांची माहिती दिली जात असून आपला गट, कार्यकर्ते कशा पद्धतीने आपल्याबरोबर राहतील आपल्या पक्षाचा विचार, उमेदवारांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून याचा आपल्या उमेदवाराला कशा पद्धतीने मतदानामध्ये फायदा होईल याची योग्य पध्दतीने कशी मोट बांधता येईल याबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे.





