अहमदनगर – निघोज रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच

निघोज – गेली दोन महिन्यांत अपघातांची मालिका सुरू असलेल्या निघोज – वडगाव – देवीभोयरे रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. याठिकाणी मोठ्या अपघाताची वाट हे अधिकारी पाहत आहे की काय असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत
या खड्यांमुळे दुचाकी अपघातांची संख्या वाढली आहे. दोन ते तीन जण यमसदनी गेले आहेत. पाच ते दहा जणांना हॉस्पिटलमध्ये दिर्घकाळ उपचार घेऊन मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपा काढीत आहेत. लवकरच या खड्ड्यांचे कामे तसेच रस्त्यावरील कामे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निघोज, वडगाव गुंड व देवीभोयरे ग्रामस्थांनी दिला आहे.
वडगाव गुंड येथील मंदिरापासून चारशे फूट अंतरावर रस्त्याच्या कडेला एक मोठा खड्डा असून रात्री -अपरात्री येणाऱ्या गाड्यांना हा खड्डा दिसत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. तशातच निघोज, वडगाव गुंड, देवीभोयरे रस्त्यावर साईडपट्टी नसल्याने हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे.
-अविनाश भांबरे, संचालक मळगंगा पतसंस्था





