दीड दिवसाच्या बाप्पाला मावळात भावपूर्ण निरोप

पवनानगर – घरगुती दीड दिवसांच्या गणरायाला मंगलमय वातावरणामध्ये पवनानगर परिसरामध्ये वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र गुरूवारी (दि.1) पहायला मिळाले. पवनानगर परिसरामध्ये गणरायाचे मोठ्या आनंद आणि भक्तीभावाने मोठ्या उत्साहात स्वागत करुन मनोभावे सेवी करण्यात आली. ग्रामिण भागामध्ये गावातील काही घरामध्ये दिड दिवसाचा गणपती बसवला जातो. आज काही गावामध्ये या गणरायाला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; “गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ या घोषात मिरवणुक दुमदुमली होती. तर महिलांनी फेर धरुन गौरीची गाणी म्हटली. यामुळे सर्व वातावरण मगंलमय झाले होते
ठाकुरसाई, काले, पवनानगर, ब्राह्मणोली या गावातील नागरिकांनी पवना धरणाच्या काठावर वाजत गाजत नेऊन गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तर कोथुर्णे, येळसे, शिवली या गावातील नागरिकांनी पवनानदीच्या तीरावर विसर्जन केले. यामध्ये लहान मुलांसह तरूण व ज्येष्ठ नागरिकांना मिरवणुकीत सहभाग घेतला होता. या परिसरातील अनेक गांवामध्ये ढोल लेझीम पथके आहेत. या ढोलांना पुणे मुंबई,ठाणे,कल्याण या भागातुन गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या ढोलामध्ये गावातील अनेक तरूण सहभागी असतात त्यामुळे मिरवणुकीत तरूणांची संख्या तुलनेत कमी जाणवत होती.
कामशेतला बाप्पाला भावपूर्ण निरोप
कामशेत परिसरात अनेक ठिकाणी दीड दिवसाचे गणपती घरोघरी बसविण्यात आले होते. अशा दीड दिवसाच्या गणरायास भावपूर्ण निरोप देण्यात आला. घरगुती गणपतीस वाजत गाजत निरोप देण्यात आला. तसेच जवळपासचे शेजारी, नातेवाईक यांचे एकत्रित करून सामूहिक पद्धतीने गणेश विसर्जन केले. बाळ गोपाळांचा उत्साह मोठा होता मोठ्या आनंदाने गणपती विसर्जन करण्यासाठी सामील झाले होते. या वेळी गणरायाच्या घोषणा देत, मिरवणूक काढून कामशेतच्या इंद्रायणी नदीतपात्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





