नाशिक : अकोला जिल्ह्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील माहोळ गावात अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हल्ल्यात त्यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्या असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माहोळ गावात असताना काही हल्लेखोरांनी पटेल यांना घेरून त्यांच्यावर सपासप वार केले. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव आणि जखमांचे गांभीर्य लक्षात घेता प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. अकोल्यात कडक पोलीस बंदोबस्त हल्ल्याची माहिती मिळताच अकोला आणि अकोट परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी अकोला शहरासह माहोळ गावात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना करण्यात आली असून, घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. राजकीय वैमनस्याचा संशय महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आले होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका बोडके यांनी हिदायत पटेल यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केल्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. हिदायत पटेल कोण आहेत? हिदायत पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असून अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आक्रमक आणि प्रभावी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती. या घटनेने अकोला जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, सर्वांचे लक्ष आता पोलिस तपासाकडे लागले आहे.