नांदेड : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नांदेड भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी उमेदवारीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांचे खंदे समर्थक व माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चव्हाणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या ३५-४० नगरसेवकांपैकी भानुसिंह रावत एक होते. १९८० पासून चव्हाणांचे निष्ठावान राहिलेल्या रावत यांनी प्रभाग १६ मधून मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, ऐनवेळी तिकीट कापल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. “निष्ठेची किंमत शून्य झाली असून, उमेदवारीसाठी पैशांचा बाजार मांडला गेला आहे,” असा घणाघाती आरोप रावत यांनी केला. तसेच, पक्षात घराणेशाही चालवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. केवळ रावतच नव्हे, तर माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे आणि महिला आघाडीच्या महादेवी मटपटी यांनीही भाजप महानगराध्यक्षांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. यामुळे नांदेड भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. काका-पुतण्या आमनेसामने – भानुसिंह रावत यांनी आता शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला असून प्रभाग १७ मधून आपला मुलगा अक्षयसिंह रावत याला मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने दीपकसिंह रावत यांना उमेदवारी दिल्याने या प्रभागात आता ‘काका विरुद्ध पुतण्या’ असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. आता या आरोपांवर अशोक चव्हाण काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.