वॉशिंग्टन – जगातील सर्वात प्रसिद्ध टायटॅनिक जहाजाच्या समुद्राखालील ढिगाऱ्यामधून अनेक मौल्यवान वस्तू आणि कलाकृती मिळाल्या आहेत. त्या एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या कलाकृती ज्या गोदामात किंवा संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत, ते अतिशय गुप्त ठेवण्यात आले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील अॅटलांटा या शहरात कुठेतरी हे संग्रहालय आहे. या गोदामातील कपाटांमध्ये हजारो वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये उलटा ठेवलेला बाथटब, जहाजात असणारी छोटी गोलाकार खिडकी, बारीक नक्षीकाम असलेली काचेची भांडी आणि छोटी बटणं अशा असंख्य वस्तूंचा समावेश आहे. आरएमएस टायटॅनिक इन्कॉर्पोरेशन कंपनीनं या सर्व कलाकृती शोधल्या आहेत. या कलाकृतींचा संग्रह करणाऱ्या कंपनीच्या संचालिका टोमासिना रे आहेत. आरएमएस टायटॅनिक इन्कॉर्पोरेशन या अमेरिकन कंपनीकडं टायटॅनिकच्या समुद्राखालील ढिगाऱ्यामधून वस्तू शोधण्याचे अधिकार आहेत. कंपनीनं आजवर जहाजाच्या अवशेषांतून किंवा भंगारातून 5,500 पेक्षा अधिक वस्तू मिळवल्या आहेत. यातील काही निवडक वस्तूंंचं जगभरात प्रदर्शनही करण्यात आलं आहे. मगरीच्या कातड्यापासून बनवण्यात आलेल्या हँडबॅगबाबत सर्वात जास्त आकर्षण आहे. उत्तर अटलांटिक महासागराच्या तळाशी कित्येक दशकं ही बॅग सुरक्षित राहिली. या हँडबॅगेच्या आत सापडलेल्या अतिशय नाजूक वस्तू देखील सुरक्षित राहिल्या. या संग्रहामध्ये शॅम्पेनची एक बाटलीही आहे. या बाटलीत सुस्थितीतील शॅम्पेन आहे आणि बाटलीच्या तोंडावर बूच (कॉर्क) लागलेलं आहे. 1912 मध्ये एका प्रचंड हिमनगाशी टक्कर होऊन टायटॅनिक हे जहाज बुडालं. बुडताना जहाजाचे दोन तुकडे झाले आणि जहाजातील सर्व सामान विखुरलं. यामुळे विस्तीर्ण भागात जहाजाचे अवशेष पसरले.त्यावेळी जहाजावर शॅम्पेनच्या हजारो बाटल्या होत्या. जहाजावरील पहिल्या वर्गाच्या प्रवाशांना भव्यपणा, ऐश्वर्य, सर्वोत्तम जेवण आणि ड्रिंकची सेवा पुरवण्यात यावी अशी जहाजाच्या मालकाची इच्छा होती त्यामुळे प्रवाशांना शॅम्पेन, जिम, सर्वप्रकारच्या सुखसुविधा आणि विलासी गोष्टी पुरवणं हे जहाजासाठी खूपच महत्त्वाचं राहिलं असेल. टायटॅनिक पहिल्या-वहिल्या प्रवासाला निघालं होतं. साऊथॅम्पटनहून निघून ते अमेरिकेला जात असतानाच एका प्रचंड हिमनगाशी त्याची टक्कर झाली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक असलेल्या त्या काळच्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था जहाजात होत्या. टायटॅनिकबद्दल असं म्हटलं जायचं की, हे जहाज इतकं भक्कम आहे की कधीही बुडणार नाही. एरव्ही समाजात दिसून येणारा भेदभाव टायटॅनिकवरील प्रवाशांमध्येही होता. सामाजिक आणि आर्थिक पातळीवर त्यांच्यात विभागणी करण्यात आलेली होती. इतकंच काय ज्यातून चहा किंवा इतर पेय घ्यायचे ते कप आणि ज्यात जेवायचे त्या प्लेट्स (ताटं) यामध्ये सुद्धा फरक होता. लाल रंगाचा व्हाईट स्टार लोगो असलेला तिसऱ्या वर्गाचा (थर्ड क्लास) एक पांढरा मोठा कप खूपच साधारण असला तरी मजबूत आहे. तर दुसऱ्या वर्गाच्या प्लेटवर (सेकंड क्लास) सुंदर निळ्या रंगाची फुलांची नक्षी आहे. तुलनेनं ती दिसायला अधिक चांगली आहेत.मात्र पहिल्या वर्गाच्या प्लेट्स नाजूक चिनी मातीपासून बनलेल्या आहेत. त्यांच्यावर सोनेरी कडा आहेत आणि प्रकाशात पाहिल्यास त्यावर तुम्हाला फुलांच्या हाराच्या एक पॅटर्नची झलक दिसते. पहिल्या वर्गातील श्रीमंत प्रवाशांना चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण वाढण्यात येत असे. मात्र तिसऱ्या वर्गातील प्रवाशांची स्थिती वेगळी होती. तिसऱ्या वर्गातील प्रवाशांना चीनी मातीची भांडी स्वत:च हाताळावी लागायची. ही भांडी हाताळायला इतर भांड्यांपेक्षा अधिक मजबूत असायची. या गोपनीय संग्रहालयात वस्तू किंवा कलाकृती ठेवण्यासाठी लवकरच आणखी कपाटं आणि खोल्यांची गरज पडू शकते.