पिंपरी – पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला. तसेच सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिघी आणि केरळ येथे घडली. विनयदास हरिदास नांबियार (वय 44), महिला आरोपी (वय 65), हरिलाल विनयदास हरिदास नांबियार (वय 39, सर्व रा. केरळ) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 15 जून 2004 ते 8 जून 2022 या कालावधीत घडला. फिर्यादी यांचा पती विनयदास याने फिर्यादीला कोणताही घरखर्च न देता, फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच फिर्यादीशी घटस्फोट न घेता त्याने दुसरे लग्न केले.
व्हिसा मिळविण्यासाठी फिर्यादी यांची खोटी कागदपत्रे अमेरिका व भारतात सादर केली असण्याची फिर्यादीस शंका आहे. अन्य आरोपींनी माहेरहून पैसे आणावे म्हणून फिर्यादीचा मानसिक छळ केला. फिर्यादीला सासरी नांदवण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.