Pimpri : तिकोना गडावर शिवभक्तांचा जनसागर

पवन मावळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणारी व्यापक मोहीम खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि आपला मावळा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ऐतिहासिक तिकोना गडावर यशस्वीरित्या पार पडली. मुसळधार पावसातही हजारो शिवभक्तांनी गड सर करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ही मोहीम दर महिन्याला एक गड या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आली असून तिकोना हा पाचवा गड ठरला. मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. मोहिमेची सुरुवात शिवप्रतिज्ञा आणि जिजाऊ वंदनेने झाली. पावसाच्या अडथळ्यांना न जुमानता स्वच्छता, झाडांचे संरक्षण,कचरापेट्या बसवणे, वीज व सूचना फलक व्यवस्था आदी कामे शिवभक्तांनी पार पाडली.
पुणे, मुंबई, नगर जिल्ह्यातून तसेच राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून आलेल्या तरुणांनी सहभाग घेतला. विशेषतः नगरच्या ५५ विद्यार्थीनींनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर करून मोहिमेची सुरुवात गाजवली. गड-किल्ल्यांचे संवर्धन हे केवळ शासनाची जबाबदारी न राहता, जनतेचाही सहभाग आवश्यक आहे. दिल्लीश्वरांना ही हिंमत झाली नाही, पण आम्ही गडसंवर्धनासाठी लोकांबरोबर उभे आहोत, असे खासदार लंके यांनी सांगितले. तिकोना गडाच्या संवर्धनासाठी सुमारे १० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित असून, वन विभागाच्या हद्दीतील पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ४० लाखांचा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच खासदार नीलेश लंके हे संपूर्ण महाराष्ट्रात गडसंवर्धनाचे काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारे खरे हिंदुत्व ते कृतीतून जनतेसमोर मांडत आहेत.
– जयंत पाटील, आमदार, माजी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
या मोहिमेत कोणताही पक्ष वा पद नाही. सर्व जाती, धर्माचे तरूण या मोहिमेत सहभागी होत आहे. मुस्लीम समाजाचे १०० हून अधिक मावळे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गड ही आपली प्रेरणास्थानं आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी सरकारपेक्षा आपणही पावले उचलायला हवीत. या मोहिमेद्वारे गड किल्ल्यांचे महत्व, त्यांचे ऐतिहासिक स्थान, आणि शिवकालीन वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– नीलेश लंके, खासदार, लोकसभा





